Monday, May 4, 2026

#७२ फिल्फेअर एप्रिल २०२६

फिल्मफेअरचा एप्रिल २०२६ चा अंक दक्षिण भारत फिल्मफेअर अवॉर्डने भरला आहे ज्यातील बहुतेक कलाकार आपल्या ओळखीचे नसल्याने थोडेसे रटाळ वाटते वाचायला. अर्थात दक्षिणेकडे बॉलिवडपेक्षा कैकपटीने चांगले चित्रपट बनतात यात वादच नाही, त्यामुळे तेथील कलाकार आणि गौरवलेले चित्रपट यांविषयी वाचायला नेहमीच उत्सुकता असते. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांत फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आले.
अपेक्षेप्रमाणे अल्लु अर्जुनने आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पा २ साठी फिल्फेअर पटकावलाच. मल्याळम अभिनेत्रा मामुट्टी आणि चारही भाषांत काम केलेली दिग्गज अभिनेत्री उर्वशी यांनी फिल्मफेअर मिळवले पाहून आनंद वाटला. अमिताभ बच्चन आणि अरविंद स्वामी अजूनही अवॉर्ड काढतात यातच त्यांचे महानपण लपले आहे. सिंघम अभिनेत्री काजल अग्रवाल हिने बेस्ट ॲक्ट्रेस (क्रिटिक्स) या कॅटेगरीत फिल्फेअर मिळवला, कौतुक आहे!

Sunday, May 3, 2026

#७१ गॉडफादर्स ऑफ क्राईम - शीला रावळ

#marathibookreview #18/2026

प्रख्यात अंडरवर्ल्ड रिपोर्टर शीला रावळ यांचे " गॉडफादर्स ऑफ क्राईम" हे पुस्तक दाऊद इब्राहिम, अश्विन नाईक, इक्बाल मिर्ची, अरुण गवळी यांचे आत्मचरित्र आहे की काय अशी शंका येते... इतक्या तळमळीने या गँगस्टर्सची बाजू लेखिकेने मांडली आहे😃... अबू सालेमची मोनिका बेदीबरोबरची प्रेमकहाणी जबरी रंगवली आहे. मोनिकाच्या ताटातूटीने भावूक झालेल्या अनेक लोकांना कैलासवासी करणारा अबू सालेमला पुस्तकात लेखिकेने हिरो म्हणूनच समोर आणले आहे. 
बाकी सुरवातीच्या प्रकरणात दाऊद इब्राहिमच्या पोरीच्या लग्नात बिर्याणी खायला मिळाल्याचे लेखिकेचा आयुष्यातला टॉपचा क्षण वाचकांच्या नजरेत लगेच बसतो. एवढे करून दाऊदला १०० फूट लांबून देखील बघता आले नाही. पूर्ण पुस्तकात दाऊद भाईविषयी जरा जास्तच पुळका लेखिकेला असल्याचे नक्कीच जाणवते. लेखिकेचे दाऊद या व्यक्तिमत्वाविषयी माहिती देणारे फक्त छोटा राजन आणि छोटा शकील हे दोघेच. त्यांच्या भांडवलावर माननीय दाऊद भाईंचे गुन्हेगारी व्यवसायातील संस्कृती - परंपरा - अनुशासन यावर पूर्ण २७० पानांच्या पुस्तकात डान्स केला आहे.
कुख्यात गँगस्टर संतोष शेट्टी याच्यावर हिंदू डॉन असल्याने वाचकांनी थोडासा दयाळूपणा दाखवावा अशी अपेक्षा दिसत आहे. इक्बाल मिर्ची तर मासूम होता असे वाटले. देशप्रेमी अरुण गवळी आणि देशभक्त छोटा राजन यांच्या कहाण्या देखील वाचकांना आयुष्याला कलाटणी देणारी माहिती पुरवतात👏👏😭.

असो, अंडरवर्ल्ड या समाजाविषयी माझ्या ज्ञानात अमूल्य अशी भर या पुस्तकाने पडली, त्याबद्दल लेखिकेचे आभार🙏