Monday, May 4, 2026

#७२ फिल्फेअर एप्रिल २०२६

फिल्मफेअरचा एप्रिल २०२६ चा अंक दक्षिण भारत फिल्मफेअर अवॉर्डने भरला आहे ज्यातील बहुतेक कलाकार आपल्या ओळखीचे नसल्याने थोडेसे रटाळ वाटते वाचायला. अर्थात दक्षिणेकडे बॉलिवडपेक्षा कैकपटीने चांगले चित्रपट बनतात यात वादच नाही, त्यामुळे तेथील कलाकार आणि गौरवलेले चित्रपट यांविषयी वाचायला नेहमीच उत्सुकता असते. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांत फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आले.
अपेक्षेप्रमाणे अल्लु अर्जुनने आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पा २ साठी फिल्फेअर पटकावलाच. मल्याळम अभिनेत्रा मामुट्टी आणि चारही भाषांत काम केलेली दिग्गज अभिनेत्री उर्वशी यांनी फिल्मफेअर मिळवले पाहून आनंद वाटला. अमिताभ बच्चन आणि अरविंद स्वामी अजूनही अवॉर्ड काढतात यातच त्यांचे महानपण लपले आहे. सिंघम अभिनेत्री काजल अग्रवाल हिने बेस्ट ॲक्ट्रेस (क्रिटिक्स) या कॅटेगरीत फिल्फेअर मिळवला, कौतुक आहे!

Sunday, May 3, 2026

#७१ गॉडफादर्स ऑफ क्राईम - शीला रावळ

#marathibookreview #18/2026

प्रख्यात अंडरवर्ल्ड रिपोर्टर शीला रावळ यांचे " गॉडफादर्स ऑफ क्राईम" हे पुस्तक दाऊद इब्राहिम, अश्विन नाईक, इक्बाल मिर्ची, अरुण गवळी यांचे आत्मचरित्र आहे की काय अशी शंका येते... इतक्या तळमळीने या गँगस्टर्सची बाजू लेखिकेने मांडली आहे😃... अबू सालेमची मोनिका बेदीबरोबरची प्रेमकहाणी जबरी रंगवली आहे. मोनिकाच्या ताटातूटीने भावूक झालेल्या अनेक लोकांना कैलासवासी करणारा अबू सालेमला पुस्तकात लेखिकेने हिरो म्हणूनच समोर आणले आहे. 
बाकी सुरवातीच्या प्रकरणात दाऊद इब्राहिमच्या पोरीच्या लग्नात बिर्याणी खायला मिळाल्याचे लेखिकेचा आयुष्यातला टॉपचा क्षण वाचकांच्या नजरेत लगेच बसतो. एवढे करून दाऊदला १०० फूट लांबून देखील बघता आले नाही. पूर्ण पुस्तकात दाऊद भाईविषयी जरा जास्तच पुळका लेखिकेला असल्याचे नक्कीच जाणवते. लेखिकेचे दाऊद या व्यक्तिमत्वाविषयी माहिती देणारे फक्त छोटा राजन आणि छोटा शकील हे दोघेच. त्यांच्या भांडवलावर माननीय दाऊद भाईंचे गुन्हेगारी व्यवसायातील संस्कृती - परंपरा - अनुशासन यावर पूर्ण २७० पानांच्या पुस्तकात डान्स केला आहे.
कुख्यात गँगस्टर संतोष शेट्टी याच्यावर हिंदू डॉन असल्याने वाचकांनी थोडासा दयाळूपणा दाखवावा अशी अपेक्षा दिसत आहे. इक्बाल मिर्ची तर मासूम होता असे वाटले. देशप्रेमी अरुण गवळी आणि देशभक्त छोटा राजन यांच्या कहाण्या देखील वाचकांना आयुष्याला कलाटणी देणारी माहिती पुरवतात👏👏😭.

असो, अंडरवर्ल्ड या समाजाविषयी माझ्या ज्ञानात अमूल्य अशी भर या पुस्तकाने पडली, त्याबद्दल लेखिकेचे आभार🙏

Tuesday, April 21, 2026

#७० द फर्म - जॉन ग्रीशम

#marathibookreview #17/2026

"द फर्म" ही सुप्रसिद्ध अमेरिकी लेखक (जे पेशाने अनेक वर्ष वकील होते) यांची पहिली आणि गाजलेली कादंबरी.
मनी लाँड्रिंग, गुप्त खाती ज्यात खातेदाराच्या शारीरिक वर्णनानुसार आणि कोडवर्ड्स वर बँक व्यवहार होतात, मोरल्टो माफिया फॅमिली, गुन्हेगारीच्या पैशाचे बेमालूमपणे पांढरे करण्याचा व्यवसाय करणारी बेन्डिनी ही वकिली फर्म... आणि हे लोकं त्यांच्या दुर्दैवाने २००० अर्ज छानून हार्वर्ड मधून उत्तम गुणांनी  वकिलीची परिक्षा पास झालेला मीच वाय. मॅकडिअर याला फर्म मध्ये रुजू करवून घेतात आणि कथानकाला सुरवात होते.

कथानक भरपूर वळणं घेते आणि अखेरीस माफिया फॅमिलीला शिक्षा होते. एफबीआयचा सरकारी ढिसाळ तपास, मीच आणि त्याची सुंदर बायको ऍबी, अनेक भाषा येणारा त्याचा भाऊ रे, त्याचे सहकारी क्वीन, लामार, लॅम्बर्ट डीवॉशर आणि बॉस अव्होरी यांच्या भोवती कथानक फिरत राहते आणि प्रत्येक पानावर उत्कंठावर्धक होत जाते. वेन टेरेन्स याची एफबीआय अधिकाऱ्याची भूमिका छान रंगवली आहे लेखकाने.

लेखक अनिल काळे यांनी उत्तम अनुवाद केलेला आहे. एकंदरीत नेहमीप्रमाणेच अमेरिकी भव्यदिव्य आणि खिळवून ठेवणारी ही ४८० पानांची कादंबरी !!!. मजा आली.

Monday, April 6, 2026

#६९ द मोटरसायकल डायरीज - चे गव्हेरो

#marathibookreview #१६/२०२६

चे गव्हेरा आणि त्याचा दोस्त अल्बर्टो ग्रॅनाडो यांनी लापोडेरोसा मोटरसायकलवर दक्षिण अमेरिका म्हणजेच मेक्सिको, पेरू, चिली, व्हेनेझुएला पालथी घातली त्याचा रंजक प्रवास "द मोटरसायकल डायरीज" या पुस्तकात वाचायला मिळाला.
तसा चे हा साठाव्या दशकातील तरुणांच्या गळ्यातील ताईत.... फिडोल कॅस्ट्रोला भेटल्यावर तो क्युबामधे क्रांतिकारी झाला आणि शेवट बोल्हीवियामध्ये क्रांतिकारी म्हणूनच शहीद झाला.

तर या २५६ पानांच्या पुस्तकात अनेस्ट्रो ऊर्फ चे गव्हेरा याच्या मोटरसायकल प्रवासातील रोजनिशी छापली आहे. ती फारच रोमहर्षक आहे. खिशात दमडी नसताना, अनोळखी लोकांबरोबर वाटेल त्या परस्थिती मध्ये तोंड देत त्यांनी ही नोंदवही लिहिली आहे. त्यात चे यांचे भावनाविवश निरीक्षण आणि नकळत साम्राज्यवादविरोधात असलेले विश्लेषण नक्कीच वाचकांना विचार करायला भाग पाडतात. या पुस्तकात खरं तर चे गव्हेरा कसा घडत गेला याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

पेरू, चिली येथील शहरे, गावे मला फारशी माहिती नसल्याने अतिरिक्त वाचन या पुस्तकामुळे झाले आणि चिली देशाला एकदा तरी जाऊन यावे प्रवासास ही इच्छा झाली😃

Friday, April 3, 2026

#६८ अश्वत्थामा - लेखक आशुतोष गर्ग

#marathibookreview #15/2026
महाभारताच्या भीषण युद्धाच्या अंतानंतर अश्वत्थामा मृत्यूच्या पूर्णविरामापर्यंत भटकंतीला निघतो...ती भटकंती आजही चालूच आहे म्हणतात.
आशुतोष गर्ग यांच्या "अश्वत्थामा" या १६८ पानी पुस्तकाची सर्वात अश्वथामाच्या दूर निर्जन जंगलातील निवेदनाने सुरवात होते... मग अश्वत्थामा तुम्हाला महाभारतातील त्याचा जिथे जिथे सहभाग होता त्या घटनांमध्ये फिरवून आणतो. प्रत्येक घटनेत अश्वत्थामा त्याला अधर्माच्या बाजूला उभे राहिल्याचे बोचरे दुःख सांगत राहतो. अखेरीस पाचही पांडव पुत्र आणि उर्वशीच्या गर्भातील भ्रूणहत्येचे पाप केल्याचे मान्य करतो आणि श्रीकृष्णाने दिलेली शिक्षा स्वीकारतो.

उपसंहारात अश्वत्थामा त्याच्या करुण कहाणीतून मानवाने काय शिकले पाहिजे हे सांगतो.
खरं सांगायचं तर लेखकाने हे पुस्तक लिहिण्याचे प्रयोजन मला समजले नाही...ना या पुस्तकातून कुठलाही वेगळा विचार / दृष्टीकोन सापडला नाही. एकंदरीत विशेष पुस्तक नाही असे म्हणावे लागेल.

#67 फिल्मफेअर मार्च 2026

#14/2026

फिल्मफेअर मार्च 2026 च्या अंकात नेपो किड सुनील शेट्टीच्या मुलाला कव्हर पेजचा मान मिळाला... अण्णाची कृपा, अजून काय😃.
बॉर्डर २ अभिनेत्री सोनम बाजवाचा देसी ब्लिंग स्टाईल रॅपिड मुलाखत आश्चर्यकारक छान झाली आहे, पण याच चित्रपटाचा हिरो आहान शेट्टी मला काही फार आश्वासक वाटला नाही. सुनील शेट्टीचा प्रभाव असेल माझ्यावरचा कदाचित🤦🏻‍♂️.
इम्रान हाश्मी आणि माधुरी दीक्षितची मुलाखत ठीक ठाक. माधुरी आता फक्त AI नेच तरुण दिसू शकते, हे तिने मान्य केले पाहिजे. जॉनी लिव्हरचा इंटरव्ह्यू वाचायला मजा आली, आपोआपच स्माईल येते चेहऱ्यावर!
भूमी पेडणेकर मला कधीकाळी आश्वासक अभिनेत्री वाटली होती. पण तिचे विचार वाचताना ती खोटेपणाचा बुरखा घालते आहे असेच वाटले. असो, पोटासाठी काय पण! पूर्वी  तेलगू चित्रपटसृष्टीमधून बॉलीवूड मध्ये येणे अभिमानास्पद होते कलाकारांना...आता उलटे आहे. त्यामुळे प्रसिद्ध चित्रपट छायाचित्रकार मोहनन यांची मुलगी मालविका फिल्मफेअर मध्ये झळकली. आधी मी नेपो किड नाही म्हणायचं आणि पुढे मी फक्त प्रथितयश अभिनेत्याबरोबरच पदार्पण करणार होते असे सांगते. अर्थात प्रभास बरोबर फिल्म मिळाली हे तिचे भाग्यच!

अभय वर्मा हा टप्राड बॉडीचा हिरो सुहाना खान बरोबर किंग चित्रपटात काम करतो आहे...त्याला कोणती गोष्ट प्रवासात न्यायला विसरत नाही, यावर तो स्किनकेअर इसेन्शियल हे उत्तर देतो. भंगार पत्रकार त्याला स्कीन केअर रूटीन काय आहे हे विचारते...काय सुट्यापणा आहे हा😝.
सुमित अरोरा या टीव्ही मालिका आणि आता चित्रपटांसाठी स्क्रिप्ट आणि डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाची मुलाखत वाचून आनंद वाटला. शॉटगन सिन्हा यांचे बरोबर पुन्हा एकदा वाचकांची रॅपिड फायर प्रश्नोत्तरे छापली आहे. मी पण पुढच्या अंकासाठी प्रश्न पाठवला आहे, बघुयात त्यांना तो आवडतो का आणि मला हजार रुपयाचे बक्षीस मिळते का!😎

Sunday, March 22, 2026

#६६ ऍड हेर दिवाण - गाठ फाशीच्या फंद्याची - लेखक विजय देव

#marathibookreview #13/2026

" ऍड हेर दिवाण - गाठ फाशीच्या फंद्याची" ही विजय देव लिखित न्यायालयीन गुप्तहेर कथा !! 
ऍड माधव दिवाण हा नवखा वकील करियर सुरवातीच्या कठीण परिस्थितीतून जात असतो आणि त्यातच घरातलीच एक खुनाची केस त्याच्यावर येऊन पडते. मग घरातल्यांनी भीतीपोटी मोठा वकील नेमू या नादात या विजिगीषु वकिलावर विश्वास दाखवला नाही... पण तरीही हेरगिरी करत या वकिलाने आरोपी क्रमांक एक बाळू वाघमारे याचे वकीलपत्र घेत ही केस कशी फिरवली याचे तार्किक आणि रंजक कथानक लेखकाने रंगवले आहे.
या पुस्तकात पहिल्या अनेक पानात ऐंशी किंव्हा नव्वदाव्या दशकाच्या सुरवातीचे हे कथानक असल्याचे वाटत होते, परंतु शेवटच्या काही पानात ते २००५ च्या सुमारास असल्याचे जाणीव करून दिले, ही एकच कादंबरीतील विसंगती मला आढळली. बाकी लेखन संथ आणि छान. 
माधवीचा राग येतो वाचकांना, तर माधवच्या घबराट स्वभावाला देखील आपण दूषणे देतो. अर्थात ऍड दिवाण यांची कोर्टातील अर्ग्युमेंट्स ही फारच सुरेख रेखाटली आहेत या कादंबरीत, त्यामुळे मजा आली वाचताना!