Saturday, February 28, 2026

#६१ स्टार विटनेस - लेखक बाबा कदम

#marathibookreview #8/2026

"स्टार विटनेस" म्हणजे फौजदारी खटल्यातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार. ख्यातनाम लेखक बाबा कदम यांनी ६० पेक्षा जास्त कादंबऱ्या सत्य घटनांवर लिहल्या...त्यातलीच एक २२८ पानांची कादंबरी "स्टार विटनेस"!!

सागरी जमातीतील बोरबेटचे पाटील - भागोजी पाटील आपल्या बेपत्ता कन्येची तक्रार द्यायला खोपोली पोलिस स्टेशनमध्ये येतात आणि कहाणीला सुरवात होते. सब इन्स्पेक्टर दुंडप्पा संकपाळ या घटनेचा तपास करायला घेतात आणि ऑनर किलिंगच्या दुहेरी खून खटल्यापर्यंत हा प्रवास पोचतो.
कादंबरीतील सर्वच पात्रे वाचकांना त्यांच्या खऱ्या आणि सोपे वागण्याने खिळवून ठेवतात. आरोपी सुब्रा पाटील, नायक आणि स्टार विटनेस गोपाल पांडे, डॉक्टर राव, झेनिथ कंपनीतील सुरक्षा प्रमुख जामदार साहेब हे सर्वच पात्रे कथानक नाट्यमय करतात.
कादंबरीच्या शेवटच्या भागात कोर्टातील आरोपींची पेशी, साक्षीदारांची उलटतपासणी, आरोपींचे वकील ऍडव्होकेट जोगळेकर यांचे दर्जेदार युक्तिवाद आणि पब्लिक प्रोसिक्युटर (लेखक स्वतः सरकारी वकील पदावरून निवृत्त झालेले आहेत) यांचा लढा हे कादंबरीत जान आणतात.  सरतेशेवटी वाचकांना आंतर जातीय विवाहामध्ये समाजाच्या नाहक लुडबुडीबद्दल आणि खोट्या परंपरा याबद्दल नक्कीच क्षोभ निर्माण होतो, इतके हे ताकदवान पुस्तक !

Wednesday, February 25, 2026

#६० फिल्मफेअर फेब्रुवारी २०२६ अंक

#7/2026
फिल्मफेअरचा फेब्रुवारीचा अंक अगदीच रटाळ निघाला... कदाचित फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2025 वर सगळा कंटेंट होता आणि मी क्वचितच नेटफ्लिक्स पहात असल्याने मला जवळपास सगळ्याच कलाकारांची नावे पहिल्यांदा ऐकायला मिळाली.
स्पेशल शोकेसमध्ये मल्याळी गायक स्टेबिन बेन आणि अभिनेत्री नुपूर सॅनन ( क्रीतीची बहीण) यांच्या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि नवविवाहित दाम्पत्याची मुलाखत घेतली आहे. मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे असल्याने, कदाचित पॅकेजमध्येच हा इंटरव्ह्यू छापून मिळाला असेल.😝. दाम्पत्य आदर्श पतिपत्नीसारखे छान छान आणि आदर्श बोलले👏.
अनन्या पांडेने "कॉल मी बाई" नावाच्या सिरीजसाठी बेस्ट ॲक्टर (कॉमेडी) साठी पुरस्कार मिळवला आणि त्या बदल्यात फिल्मफेअरमध्ये १० वेळा वेगवेगळ्या भिंतीपाशी उभे राहून फोटो मिरवला🤩. अनन्या आणि माझा जीवन स्ट्रगल सारखाच आहे उगाच म्हणत नाही मी🙏.

वेगवेगळ्या विषयांवरच्या OTT सीरिज आणि चित्रपट आलेत हे तरी यामुळे मला समजले आणि काही चित्रपट नक्की बघेन असे वाटते आहे...किमान काय बघायचे म्हणून चाळण्यात वेळ घालवून झोपायला तरी आता जाणार नाही.
बाकी फिल्मफेअर OTT समारंभात कोणी काय कपडे घातले याचा लेखा जोखा फिल्मफेअरवाल्यांच्या जुन्या आवडीप्रमाणे मांडलाच आहे. शत्रुघ्न सिन्हाची वाचकांनी घेतलेली रॅपिड फायरमधली मुलखात उत्तम!

शेवटला ए आर रेहमानची "मला असं म्हणायचंच न्हवते, गैरसमज झाले, पब्लिक चुकीचे" यावर जितेश पिल्लेने लेख लिहून बाजू मांडली आहे.

Tuesday, February 24, 2026

#५९ पाकिस्तानी अणुबॉम्ब : एक घोर फसवणूक - लेखक सुधीर काळे

#marathibookreview #6/2026

"न्युक्लिअर डिसेप्शन" या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद ' पाकिस्तानी अणुबॉम्ब: एक घोर फसवणूक" या नावाने सुधीर काळे या लेखकाने केला आहे. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक डॉ अब्दुल कादीर खान यांनी तंत्रज्ञान चोरून आधी भुट्टो आणि नंतर जनरल झिया यांच्या मदतीने अणुबॉम्ब कसा सत्यात उतरवला याची ही कहाणी. जरी आपण लोकं पाकिस्तानला बेअक्कल, भुरटे, खोटारडे म्हणत असलो, तरी देखील येनकेन मार्गाने त्यांच्याकडे अणुबॉम्ब आला... इस्राएल, अमेरिकेच्या आणि युरोपच्या नजरेतून जरी पाकडे एक दिवस त्यांचा इस्लामिक बॉम्ब वापरून घात करतील अशी काळजी डोक्यात ठेऊन झोपत असले, तरी अमेरिकेच्या इराण - इराक - रशियाला शह देण्याच्या नादात या अणुबॉम्बचा जन्म झाला हे विसरून कसे चालेल. २०१५ साली प्रकाशित झालेले ४१५ पानांच्या पुस्तकात अमेरिकेने लाखो डॉलर फेकून पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर कसा केला याची परिपूर्ण वर्णन वाचायला मिळाले.
आपले भाग्य हेच की आपल्याला अफगाणिस्तान, इराण, रशिया सारखा शेजार नाहीये... नाहीतर पाकिस्तान्यांप्रमाणे आपल्या नेत्यांना विकत घेणे अमेरिकेला सहज शक्य होते.

मूळ लेखक एड्रियन लेव्ही आणि कॅथरिन स्कॉट -क्लर्क  लेखक द्वयीने लिहिलेल्या या पुस्तकात परमाणु बाजारात पैशासाठी पाकिस्तानने दहशदवाद्यांना देखील गुपिते विकल्याचे नमूद केले आहे. अर्थात ज्यांना विकले ते इराक, लिबिया तर नष्ट झाले...आता इराण युद्धाच्या उंबरठ्यावर अमेरिका असताना पाकिस्तानने विकलेला अणुबॉम्ब इराण अचानक बाहेर काढून जगाला हादरा देते का हे काही दिवसात कळेलच. देव करो आणि मी चुकीचा ठरो...पण गाझा युद्धानंतर अमेरिकेच्या मागे दहशतवादी हात धुऊन लागणार आणि २१ व्या शतकात जग पुन्हा एकदा संहारक अणुबॉम्बला तोंड देईल असे मला मनातून वाटते आहे.
बघूया😁😃

Tuesday, February 17, 2026

#५८ हाऊ टू किडनॅप द रिच - लेखक राहुल रैना

#marathibookreview #5/2026

"हाऊ टू किडनॅप द रिच" हे अफलातून पुस्तक वाचले. राहुल रैना लिखित २८२ पानांचे हे पुस्तक दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या एका तोतया उमेदवाराच्या कहाणीवर आधारित आहे. रमेश कुमार हा कथेचा नायक रुडी उर्फ रुद्राक्ष सक्सेना या अतिश्रीमंत वाया गेलेल्या पोराच्या नावावर १३ लाख रुपये मोबदल्यात ऑल इंडिया लेव्हलची परीक्षा देतो आणि चक्क भारतात पहिला येतो. रुडी मग ब्रेन ऑफ भारत या टीव्ही मालिकेचा नायक होतो आणि रमेश त्याचा मॅनेजर. 
मग कथानकात अपहरणाची मालिका सुरू होते. पुस्तकात अतिशय रंजक घटना आणि रमेश, रुडी, प्रोडयुसर ओबेरॉय, नायिका प्रिया, बिल्डर अग्रवाल - त्याचा पोरगा अभि - चहा देण्यापासून करंगळ्या कापण्याचे स्कील असलेला प्रताप ही सर्वच पात्रे सुरेख रंगवली आहेत.

लेखकाने दिल्ली टच जो पुस्तकात दिला आहे, त्याला तोड नाही...अर्थात त्यामुळेच शिव्यांचा भडिमार पुस्तकात आहेच😃.
अक्षय कुऱ्हे यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्कृष्ट केला आहे. मजा आली हे पुस्तक वाचून खूप जास्त !

Wednesday, February 11, 2026

#५७ पर्व - डॉ एस एम भैरप्पा

#marathibookreview #४/२०२६

ख्यातनाम लेखक डॉ एस एल भैरप्पा यांची गाजलेली कादंबरी "पर्व" !! महाभारतावरची वेगळ्या नजरेतून लिहिलेली ही तब्बल ७७६ पानांची कादंबरी अनुवादित केली डॉ सौ उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांनी. 

भैरप्पांनी ही कादंबरी शल्य राजाने दुर्योधन आणि धर्मराजा यातील कोणाची बाजू घ्यायची या प्रवेशाने सुरवात केली. आणि मग भीषण महाभारत युद्धाच्या अनेक घटनांमधून भीष्म, कर्ण, द्रोण, कृष्ण, भीम, कुंती, पांचाली, दुःशासन, बातमीदार संजय 😃, बलराम आणि सुभद्रा, अर्जुन अशा अनेक पात्रांच्या मनोगतातून ही ललित कादंबरी साकारली आहे. माणसांचे आणि त्यांच्या विचारांचे वेगवेगळे पैलू या कादंबरीत अनुभवायला मिळतात त्यात खूप मजा येते.

पण अगदी खरे सांगायचे तर मला ही कादंबरी काका विधातेंच्या "दुर्योधन" या कादंबरीपुढे फिकी वाटली. कदाचित अपेक्षा जास्त असेल किंव्हा अनुवाद करताना अवघड असेल. लेखकाने पुस्तकात अनेक वेळा युद्धमैदनातील हागण्या मुतण्याच्या दुर्गंधीमुळे होणारा पात्रांना त्रास, तसेच धृतराष्ट्राच्या शी शु प्रकरणे जास्तच चघळली आहेत असे वाटते. आणि अनेक वेळा जांभई आली, भूक लागली, झोप लागली हे प्रकार का घुसडले आहेत ते समजले नाहीत. म्हणजे त्यातून खरंच काही अर्थ उमजत नाही.

असो, ही गाजलेली कादंबरी वाचण्याच्या वेगळाच आनंद होता.