Sunday, December 28, 2025

#५२ अजातशत्रू - लेखक सुमेध इंगळे

#marathibookreview #50/2025

"तो माझा मुलगा आहे त्रिपुरे... बाहेरून युवराज कुणिक कुटुंबवत्सल वाटत असला तरी आतून 'किती विध्वंसक'आहे हे माझ्या मनाला पूर्ण माहितेय. तो भारतवर्षात रक्ताचे पाट वाहिल, माझा मुलगा आहे तो, मी त्याला आतून बाहेरून चांगलाच ओळखते"😀 (~ महाराणी चेलना)

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात मगध साम्राज्याच्या सिंहासनाला अक्षरशः रक्ताभिषेक घालून गादीवर बसणाऱ्या सम्राट अजातशत्रूची ही गोष्ट!!

प्रत्येक पानावर धक्का देणारे, अस्वस्थ करणारे, सतत पुढे काय असा भुंगा डोक्यात सोडणारे "अजातशत्रू" हे २८० पानांचे पुस्तक या वर्षातील मला सर्वात जास्त भावलेले पुस्तक. सुमेध नावाचा हा तरुण लेखक मराठीला लाभला हे आपले भाग्यच. खरं तर इंग्रजीसहीत भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये  अनुवादित केलीच पाहिजे इतकी ताकदवान ही कादंबरी झाली आहे.

अत्यंत ओघवत्या शैलीत लिहलेली ही कादंबरी वाचताना रक्तकंठ अश्वाचा (ज्याच्या प्रतिशोधात हा रक्तरंजित प्रवास सुरू होतो) जेंव्हा जेव्हा उल्लेख होतो तेंव्हा मात्र वाचकाला हळहळ नक्कीच वाटते!

प्रत्येकाने १००% वाचावे असे हे अफलातून पुस्तक आहे.
आपल्या पित्याला बिंबिसार राजाला मारून मगध सम्राट बनलेला अजातशत्रू अघोरी निश्चलदेवाने अघोरी शिक्षा भोगताना दिलेला शाप पुढे कुणिक पुत्राने खरा ठरवला का? प्रसेनजीत राजाने मगध राज्यावर आक्रमण केले का? अजातशत्रू पुत्र उदयन याने प्रतिशोधात तक्षशिला जाळले का?पुढचे पुस्तक येणे नक्कीच गरजेचे आहे.😃

Tuesday, December 23, 2025

#५१ ब्रिटिश गुप्तहेर संघटना - पंकज कालुवाला

#marathibookreview #49/2025

'इस्राएलची मोसाद' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पंकज कालुवाला हे जगभरातील गुप्तहेर संघटना, सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय रहस्यमयी घटना/ मोहिमा लिहिण्यात तरबेज आहेत. त्यांचे "ब्रिटिश गुप्तहेर संघटना" हे ३०८ पानी पुस्तक वाचले.
भारतासह सर्व जगालाच गुलामगिरीच्या खाईत टाकणारे, दांभिक आणि अत्यंत स्वार्थी /अप्पलपोटी स्वभावाचे ब्रिटिश तसे सर्वांच्याच डोक्यात जातात, त्यामुळे पुस्तक वाचायच्या आधीपासूनच मी पूर्वग्रहदूषित होतो हे आधी मान्य करतो.

या पुस्तकात ब्रिटिश गुप्तहेर संघटनेच्या उल्लेखनीय (आणि बहुतांशी यशस्वीसुद्धा) या मिशन्सच्या सत्यकथा आहेत. १२ पैकी ८ प्रकरणे दुसऱ्या महायुद्धात जर्मनांची ठासण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची माहिती देतात. "हिमालय परिसराचा नकाशा तयार करण्याची गुप्त मोहीम" हे प्रकरण मला जास्त आवडले. जगातील सर्वात उंच शिखर माथ्याची उंची २९००० फूट असल्याचा शोध लावणारे राधानाथ शिखधर या भारतीय विद्वानाचे श्रेय  जॉर्ज एवरेस्ट या ब्रिटिश सर्व्हेयर जनरल या नालायक माणसाने  ढापल्याचे वाचून त्याचा तिरस्कार वाटतो. त्यामुळे "नेपाळी देवधुंदला" आपणच आता एव्हरेस्टेवजी "सगरमाथा" म्हणायला पाहिजे, त्याशिवाय ते नाव बदलले जाणार नाही.

जाता जाता शेवटच्या प्रकरणामध्ये लेखकाने आपले लाडके चाचा नेहरू आणि त्यांचा जिगरी यार मेनन यांना फळकुट फेकून मारलं आहे, ज्याचा खरं तर या पुस्तकाशी काही संबंध नाहीये, पण असो.😄.

Thursday, December 18, 2025

#५० "द हिडन लाईफ ऑफ ट्रिज" - लेखक पीटर वोह्ललेबेन

#marathibookreview #48/2025

खरं तर झाडे कचाकचा कापून नाशिक पुण्याला निरंजन टकले करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, तरी देखील कुतूहलापोटी वनस्पतीशास्त्रज्ञ पीटर वोह्ललेबेन यांचे "द हिडन लाईफ ऑफ ट्रिज" हे पुस्तक वाचले आणि धन्य झालो.

झाडे आपापसात संवाद कसे साधतात, धोक्याची सूचना एकमेकांना कशी पाठवतात, मोठी झाडे / आई झाड त्यांच्या छोट्या पोरांना कशा प्रकारे संगोपन देते, झाडांच्या आयुष्यातील शिस्तबद्धता, बुरशी- फंगस इत्यादीशी पार्टनरशिप करून झाड समाजाचा कसा उद्धार करतात, एखादा कीटक झाडाचे पान कुरतडू लागला की त्या पानाच्या पेशी एक प्रकारचा विद्युत संदेश इतर भागापर्यंत कसा पोचवतात, झाडाच्या साली वरून (म्हणजेच स्किन वरून) त्याचे वय कसे ओळखतात, जेंव्हा जमिनीतील पाणी संपते तेंव्हा तहानलेल्या झाडांचा आक्रोश होतो काय?, छोटी मोठी झाडे मुळांच्या माध्यमातून एकमेकांना पूरक खनिजे आणि पोषक अन्न कसे आदान प्रदान करतात... यासारख्या असंख्य विस्मयकारक गोष्टींचा उलगडा लेखकाने या २०८ पानांच्या पुस्तकातून केला आहे.

बाकी आपण मानव असल्याने निसर्गाला चुरडण्यासाठीच आपल्याला देवाने पृथ्वीवर पाठवले असले, तरी कुंभमेळ्यासाठी केवळ पाच दहा वर्ष वयाची अल्लड झाडे मुळासकट कापून टाकल्याने त्यांच्या फॅमिलीला काय त्रास होणार आहे, याची माहिती राजकारण्यांनी ठेवावी आणि वाचलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्या झाडांना भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश सरकारतर्फे जाहीर करावा ही नम्र विनंती 🙏🙏.

अनुवादक गुरुदास नूलकरांनी या अवघड विषयावरच्या पुस्तकाचे भाषांतर चांगले आणि सोपे केले आहे त्याचे आभार.

Friday, December 12, 2025

#४९ अ वाँटेड मॅन - लेखक ली चाईल्ड

#marathibookreview #47/2025

जॅक रिचर सारखा धिप्पाड, राकट शरीरयष्टीचा माणूस ज्याने नाकावरच जबरदस्त ठोसा खाल्लेला आहे, नेब्रासकाच्या उड्डाणपुलाखाली आयोवाहून व्हर्जिनियाला जाण्यासाठी लिफ्ट  मागत होता... तब्बल ५७ वाहनांनी झिडकारल्यावर त्याला लिफ्ट मिळाली - दोन पुरुष आणि एक बारबाला स्त्री !!

अत्यंत उत्कंठावर्धक आणि मती गुंग करणारी ली चाईल्ड या लेखकाची "अ वाँटेड मॅन" ही ४२८ पानांची कादंबरी वाचली. अफाट हाणामारी आणि बेफाट मनोरंजन तर आहेच, पण जॅक रिचरचे सतत प्रश्न विचारण्याची आणि किमान शब्दात कमाल अपमान करण्याची कला अद्भुत आहे. वाचकांना लठ्ठ माणसाच्या हॉटेलातले प्रकरण धमाल हसवते. कॅन्सस, नेब्रास्का, आयोवा, एलिनॉय आणि मिझूरी या पाच रटाळ आणि महाभूभागातील राज्यात छुप्या एफबीआय एजंट कारेन डेलफान्सो आणि एजंट सोरेन्स या अतिशय हुशार अधिकारी जॅक रिचरच्या मदतीने गुन्ह्याची उकल करतातच आणि एक महाभयंकर घातपात उघडकीस आणतात असे कथानकाचे स्वरूप आहे.
किंग, अमेरिकेत अतिरेक्यांसाठी बँक चालवणाऱ्या वाडिया आणि पुस्तकात बराच वेळ पाताळयंत्री वाटणाऱ्या मॅक्वीन या विल्हन पात्रांनी कथानक कल्पक बनवले आहे.

४२६ व्या पानावर शेवट गोड झाला, पाणी उपसा केंद्राच्या मागे मुडदा कोणाचा पडला आहे हे देखील समजते....तरी जॅक रिचर व्हर्जिनियाला नक्की कशासाठी चालला आहे, याचे वाचकांना अप्रूप वाटत राहते... उत्तर कदाचित या साहसी कथांच्या पुढच्या अंकात कळेल आपल्याला!
सरिता आठवले यांनी पुस्तकाचा अतिशय उत्तम अनुवाद केला आहे.

Tuesday, December 2, 2025

#४८ कास्ट मॅटर्स - डॉ सुरज एंगडे

डेक्कनच्या चौकात विचारवंत डॉ सुरज एंगडे यांचे पोस्टर लागले तेंव्हापासून "कास्ट मॅटर्स" या त्यांच्या दलितांवर होणाऱ्या अन्यायावरच्या पुस्तकाकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण फोल ठरल्या!!
पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत फक्त रडारड आहे. दलितांच्या अनेक छटा या प्रकरणात जो कोणी दलीत व्यक्ती आयुष्यात पुढे गेला आहे, त्याच्या नावाने बोटं मोडली आहेत लेखकाने. लेखकाने दलितांच्या कॅटेजरीज विस्तृतपणे सांगितल्या आहेत - नाममात्र दलित, पुराणमतवादी दलित, पगारदार दांभिक दलित, अपायकारक दलित, आत्मुग्ध दलित, मूलगामी दलित, उच्चभ्रू दलित!
कदाचित समाजाकडून अवास्तव अपेक्षा असल्याने लेखक डॉ सुरज असे वहात गेले असावेत, असे वाटते. नाव बदलून किंव्हा लपवून सांगितलेल्या व्यक्तींच्या दर्दभर्या कहाण्या, दलितांच्या प्रत्येक घटनेस/ परिस्थितीस ब्राम्हण आणि बनिया समाज जबाबदार आहे असं एकंदरीत या पुस्तकाचा मला समजलेला सारांश.

बाकी ३०८ पानांच्या पुस्तकात कंटेंट भरपूर आहे, जरी तो एकांगी वाटला, तरी आंबेडकरांचा लेखकाने खूप जास्त अभ्यास केल्याचे समजून येते. लेखकाकडे लिहण्याचे तंत्र आहे, पण कला नाहीये हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. कदाचित या तरुण लेखकाला मार्गदर्शन मिळाले असते, तर या पुस्तकातून नक्कीच काहीतरी मूल्यवर्धक निर्मिती झाली असती. असो, प्रियांका तुपे आणि प्रणाली एंगडे यांनी केलेला अचूक अनुवाद ही पुस्तकाची जमेची बाजू म्हणावी लागेल.

Friday, November 28, 2025

#४७ जगाला पोखरणारी डावी वाळवी - लेखक अभिजीत जोग


#marathibookreview #45/2025

"आपण क्रांतिकारी आहोत, म्हणून आपल्या गरजा समाजाने भागवल्या पाहिजे तो आपला हक्कच आहे"
भांडवलदार दोस्ताच्या पैशावर जगलेला डाव्यांचा मूळपुरुष कार्ल मार्क्स 🫩🙏🙏.

"एखाद्याने आपल्या छातीवर डोके ठेवेपर्यंत मैत्री वाढवणे आणि नंतर त्याच्या पाठीत सुरा भोसकणे या सुखाला मागे टाकेल असा आनंद आयुष्यात कुठेच नाही" ~ मा स्टालिन साहेब.

"जगाला पोखरणारी डावी वाळवी" हे अभिजित जोग लिखित तब्बल २५४ संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून लिहलेले ३०२ पानांचे पुस्तक वाचले. माझा रिव्ह्यू संमिश्र आहे हे आधीच सांगतो. 
पुस्तकात अमेरिकेत फोफावलेल्या डाव्या विचारसरणीवर दीर्घ मंथन केले आहे. डाव्या.विचारसरणीचे मूळ आणि कुळ या प्रकरणात लेखकाने कार्ल मार्क्स, लेनिन, स्टालिन, वूल्फ ऑफ क्रेमलिन या डाव्या लोकांच्या दैवतांना नंगा केला आहे. द्वेष हा कम्युनिस्ट विचारसरणीचा गाभा आहे हे त्वेषाने मांडताना लेखकाने हिटलर डाव्या विचारसरणीचा होता अशी थिअरी मांडली आहे🤡😝. मग याच प्रकारच्या थेऱ्या तयार करत रशियन क्रांती हीच दंतकथा होती, डीप स्टेट - वोकिझम, LGBTQ, स्त्री-वाद इत्यादी ही डाव्यांनी पेरलेली वाळवी आहे... मग पुढे तालिबान सोडताना बायडन आजोबांनी ७ बिलियनची शस्त्रास्त्र मुद्दाम मागे सोडून दिली...अशा स्टोऱ्या लावल्याने पुस्तक गंडत गेले आहे. शोषण मिडिया मध्ये कोणीपण कोणाला कायपण म्हणतो, त्यावरून सगळ्या ठिकाणी डाव्यांची लॉबी आहे हे अतार्किक वाटते. अर्थात हे पुस्तक वाचून प्रत्येक पोस्ट, लिखाणाला आपण यात डाव्यांचा छुपा हात नाही ना या नजरेने किमान काही दिवस मी बघेन अशी अवस्था झाली आहे🥹💆🥹🫩🫩🫩.

सुन त्झू याने तयार केलेले सात नियम वाचून भाजप हाच खरा क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष आहे की काय वाटायला लागेल😭😭. मला तर डाव्यांचे अनेक विचार हे पुस्तक वाचून पहिल्यांदा समजले आणि त्यातील अनेक पटले🥹😭.

शेवटच्या प्रकरणात भारतासाठी रात्र वैऱ्याची आहे यातील विचार आणि उदाहरणे मात्र पटतात. पण डाव्यांपेक्षा भारताचे स्वकीय लोकांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचारी विचारांना लगाम घालण्यासाठी दाखवलेली निष्क्रियताच कारणीभूत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ज्योती बसुंच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकसभेत चार जागा (केरळच्या जीवावर) आणि बंगालात शून्य... काय क्रांती करणार हे तेलकट केसांचे, जाड चष्म्याचे, मळके कपडे घालणारे अतिहुशार नेते ... आणि चुकून जिंकलेच तर मोदीशा खोके देऊन ओके करतीलच, की मार्क्सला पण भाजपात आणतील 😭😭.

असो, कट्टर डावे आणि कट्टर उजवे अशा दोघांनीही आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे हे👏👏👏.

Sunday, November 23, 2025

#४६ क्लोज एन्काऊंटर्स - लेखक पुरुषोत्तम बेर्डे

लक्ष्याचे मोठे बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांचे बालपण मुंबईतील कामठीपुरत्यातल्या गल्ल्यांमध्ये गेले आहे, हे वाचून कोणालाही आश्चर्यच वाटेल...कारण कामाठीपुरा हा काही सज्जन लोकांचा राहण्याचा पत्ता नाहीये अशी अजूनही लोकांची समजूत आहे.
टुरटुर, जाऊबाई जोरात सारख्या गाजलेल्या नाटकाचे लेखक पुरुषोत्तम बेर्डे त्यांच्या  "क्लोज एन्काऊंटर्स" या जबरी पुस्तकात कामाठीपुऱ्याच्या १६ गल्ल्यांमध्ये त्यांनी अनुभवलेल्या २४ जणांचे व्यक्तिचित्रण केले आहे. अखंड चालणारी राडेबाजी, सिनेमा, फुटकळ कारणाने होणाऱ्या हिंदू - मुसलमान दंगली आणि गल्ली क्रिकेट यात सर्व पात्रे फिरतात आणि कामाठीपुऱ्याचं आयुष्य उलगडून दाखवतात.

२३६ पानांच्या या पुस्तकात डेंजर याद्या,  राजम्मा, तात्या आमोणकर आणि बालाका डायरेक्शन, शेट्टी लोकं (रोहित शेट्टीचा बाप) आणि भंगार बिजनेसची मालकीण पुंजाताई या व्यक्तिरेखा मला विशेष आवडल्या.

लेखक जयंत पवार यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे ज्यात माडगूळकरांच्या "ढसाळ नामदेवाचे दिवस आता आले आहेत" हे काँटेक्स्ट सोडून लिहलेले वाक्य किंव्हा मराठी साहित्याच्या नाड्या या दीर्घकाळ उच्चवर्णीय, सुशिक्षित आणि पांढरपेक्षा समाजाच्या हातात राहिल्याने बाकीचे लेखक परिघाच्या बाहेर राहिले, ही रडारड करायला नको होती असे वाटते. हमाल दे धमाल चित्रपटाचे कथा - पटकथा - संवाद लिहिणारे पुरुषोत्तम बेर्डे हे अतिशय उत्तम लेखक आहेत यात शंकाच नाही. परंतु मुळात वाचक कोणत्याही लेखकाचे लिखाण साहित्यिक फुटपट्ट्यांत मोजत नाही हेच सत्य आहे, हे पवारांनी समजून घेतले पाहिजे.
वाचनीय पुस्तक !

Thursday, November 20, 2025

#४५ रारंग ढांग - लेखक प्रभाकर पेंढारकर

#BookReview4/2025 #रारंग ढांग"

चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांच्या मुलाचे प्रभाकर पेंढरकरांचे "रारंग ढांग" हे  खूप जुने पुस्तक वाचून काढले.  भारताची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालयात अत्यंत उंचीच्या आणि बिकट नैसर्गिक परिस्थितीत रस्ते बांधण्याचे काम अनेक दशके करत आहे. या रस्ता बांधणीतील सर्वात अवघड भाग म्हणजे हिमालयाच्या उभ्या कड्यामधून खोदून रस्ता काढायचा आहे. या नितळ, उभ्या कड्यांना स्थानिक भाषेत "ढांग" म्हटले जाते. हे १६८ पानी पुस्तक हिमालयातील दुर्गम नैसर्गिक परिस्थिती आणि त्यावर आपल्या अगम्य इच्छाशक्तीच्या जोरावर झुंज देणाऱ्या लेफ्टनंट विश्वास मेहेंदळे यांच्या नैतिक  पराभवाची तात्विक मीमांसा करते.  आर्मी मधल्या मेजर, कर्नल, लेफ्टनंट, सुभेदार यांच्यातील संवाद आपल्याला नकळत किन्नोर हिमालयाच्या आसपास तळ ठोकणाऱ्या आर्मी लाईफ जगायला देते. मेजर बंबांचं "यू ब्लडी सिव्हिलियन" हे लेफ्टनंट विश्वनाथला संबोधणे, जाता येता रम - व्हिस्कीचे पेग भरणे आणि इतरही अनेक संवाद इंग्रजळलेल्या इंडियन आर्मीचा अंतरंग दाखवते. विश्वनाथला पत्र लिहिणारी चित्रकार उमा, कॅप्टन मीनूचे नवीन दिल शांतारानी, सर्जेरावची लग्नाआधीच अकस्मात विधवा झालेली पारू, परवानगी शिवाय स्मृतीस्तंभ उभा केल्याबद्दल कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागलेला तरुण लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे प्रत्येक प्रसंग पुस्तकात नजरेसमोर आणण्याइतका सुरेख रेखाटला आहे.

मजा आली हे पुस्तक वाचून !!

# ४४ युक्रेनयुद्ध- सत्ता संघर्ष की ऊर्जा संघर्ष? लेखक आशिष काळकर

#marathibookreview #43/2025

खरं तर मी सर्वच विषयातील तज्ञ असून देखील "युक्रेन रशिया युद्ध" या विषयावर एका बिबवेवाडीतील पोराला ..."रशियाने २ करोड रुपयाचे एक मिसाईल टाकून फक्त दोन जखमी आणि एक तीन मजली बिल्डिंग पाडली, यावरून ROI चा विचार पुतिन मामा करत नाहीत", ही एकमेव कॉमेंट वगळता कधी फारसे भाष्य केले नाही.
शोषण मिडियावर आम्हा सर्व विषयातील सर्व माहिती असलेल्या तज्ञांना सारखा अभ्यास करावा लागतो, म्हणून लेखक आशिष काळकर यांचे "युक्रेनयुद्ध - सत्ता संघर्ष की ऊर्जा संघर्ष" हे पुस्तक वाचून काढले. युक्रेन युद्धाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी लेखकाने या २०८ पानांच्या पुस्तकात विस्तृतपणे उलगडली आहे. 
युक्रेन आणि रशियाचा इतिहास, अमेरिकेने गेली अनेक दशके रशियाला नामोहरम करण्यासाठी युरोपच्या खांद्यावरून खेळलेले कपटी डावपेच, सोव्हिएत विघटनानंतरची समीकरणे, पुतिन मामांचा उदय, ऊर्जास्त्रोतांची गुंतागुंत, सौदी राजपुत्र मोहम्मद बीन सलमान आणि ओपेक यांचे अमेरिकला काटशह देण्याचे प्रयत्न, क्रिमियाचा पाडाव आणि अखेरीस झेलेन्स्की (आणि त्याच्या आधी कुचमा) यांच्या आंधळ्या युरोप - नाटो प्रेमात युक्रेनला कायमच्या अंधारात नेले अशा अनेक घटनांचे विवेचन या पुस्तकात लेखकाने विस्तृतपणे केले आहे.

शेवट स्वतःच्या भूमीला झळ लागू न देता परस्पर पावण्याच्या वहाणेने विंचू मारायची अमेरिकी राजनीती, अत्यंत थंड डोक्याने काम करणाऱ्या वल्दिमिर पुतिन यांच्या पाताळयंत्री राजकारणाचा वेध घेण्यात अयशस्वी ठरलेल्या  युरोपियन नेत्यांमुळे आणि सतत 'युरोप की रशिया' या यक्षप्रश्नात अडकून पडलेल्या युक्रेनच्या नितीशून्य राजकारण्यांनी युक्रेनचा कायमचाच बळी घेतला आहे हे वाचकांना समजू शकते.

#४३ द एबीसी मर्डर्स - लेखक अगाथा ख्रिस्ती

#marathibookreview #42/2025

अब्जाहून जास्त पुस्तके विकण्याचा विक्रम असलेली जगप्रसिद्ध लेखिका अगाथा ख्रिस्ती ही "क्विन ऑफ क्राइम" म्हणून प्रसिद्ध आहे. लेखिकेच्या हर्क्युल पायरो या गुप्तहेर मालिकेतील सगळीच पुस्तके आता मराठीसह शंभरहून जास्त भाषांत अनुवादित झाली आहे, त्यातीलच "द एबीसी मर्डर्स" ही एका पिसाट सिरियल Alphabetical खुनांची चित्तथरारक कथा !!

नेहमीपेक्षा हर्क्युल पायरोने हे प्रकरण वेगळ्या प्रकारे हाताळल्याने वाचताना मजा आली. मिस्टर अलेक्झांडर बोनापार्ट कस्ट हा माणूस फक्त मनोरुग्ण आहे म्हणून केस सुटणार न्हवती. वेडा आहे म्हणून वेड्यासारखा वागतो असे समजणे चुकीचे आहे. वेडा माणूस शाहण्यासारखे तर्कसंगत विचार करून कृत्य करतो, अगदी पूर्वग्रह देखील ठेवतो. चार खून करणे आणि त्याविषयी पायरोला आगाऊ पत्र लिहून कळवतो ही अंत:प्रेरणा असू शकेल? मुळात समतोल विचार करणारी बुद्धी अंत:प्रेरणा वगैरे मनात नसते😀. 
२८० पानांच्या या पुस्तकातील सर्वच पात्रे आणि घटनास्थळे वेगवान फिरत असतात, त्यामुळे शेवटपर्यंत क्लासिक ब्रिटिश तपास पद्धत वाचकांना खिळवून ठेवते!

मी आर्चर, सिडनी शेल्डन या लेखकांच्या अमेरिकी पात्रांच्या भव्यतेचा भक्त असल्याने अगाथा ख्रिस्ती या ब्रिटिश लेखिकेला कायम कमी मान देतो, तरीदेखील The ABC Murders हे पुस्तक इतके वर्ष मी उगाचच वाचले नाही असे आता वाटते. रेखा देशपांडे यांनी या (माझ्या लेव्हलला न झेपणाऱ्या) अवघड इंग्रजीतील पुस्तकाचा अनुवाद केल्याबद्दल त्यांचे आभार.🙏

Monday, November 17, 2025

#४२ चहा - लेखक रॉय मॉक्सहॅम

#marathibookreview #41/2025

५५% CTC आणि ४५% सुपर डस्ट हे माझे आवडते कॉम्बो आहे चहा बनवण्याचे.... आजपर्यंत, हे पुस्तक वाचून होईपर्यंत......😄.

एकदा गुवाहाटीला मला असली "हेमंतीय दार्जिलिंग" चहा पिताना Tea - Addiction, Exploitation and Empire हे चहा मळ्यात अनेक वर्ष रिझवलेल्या रॉय मॉक्सीहॅम या लेखकाचे पुस्तक दिसले होते, त्याचा मराठी अनुवाद वाचायला आता योग आला.

पोर्तुगाल राजकन्येनी १६६२ मध्ये हुंड्यात आणलेल्या मुंबईबरोबर चिनी चहा आणला, इंग्रजांना पहिल्यांदा त्याचे व्यसन लावले... आणि मग अठराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने अफू आणि चहाच्या व्यापारातून जो धुडगूस घातला तिथपासून टेटले, बुक बॉण्ड आणि लिप्टन या महाकाय चहा ब्रँड्सच्या साम्राज्याचा या पुस्तकात विस्मयकारक प्रवास मांडला आहे. चीन आणि ब्रिटिशांची फुटकळ चहाच्या धंद्यावरून युद्ध होऊन हजारो चिनी आणि ब्रिटिश सैनिक मारले गेले हे वाचून हसावे का रडावे वाटले. आपली जनता व्यसनी होते आहे म्हणून जप्त केलेला अफू समुद्रात फेकून देणाऱ्या चिनी सम्राटाविरुद्ध ब्रिटिशांनी युद्ध केले आणि सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सगळीकडे हेच करत राहिले आणि त्यामुळे आज सगळेच त्यांचा बदला घेत आहेत.
खरं तर चहाच्या बदल्यात अफू हे चीनवरचे त्याकाळचे अरिष्टच होते. भारतात उच्च प्रतीचा अफू तयार होत होता ही माहिती मला न्हवती, ती या चहा संघर्षामुळे समजली. पुढे भारतात आसाम आणि बंगालमध्ये ब्रिटिशांनी अत्यंत भीषण/ अमानवी परिस्थितीत काम करायला लाऊन भारतीय कामगारांचे शोषण करून चहा तयार करून घेतला हे वाचून वाईट वाटले.

बाकी त्या चिनी सम्राटाच्या शाही चहाच्या मैफिलीत आपण असायला हवे होते असे मनोमन वाटते. चहा वाढवण्याच्या चिनी पद्धती, चहाच्या पानांवरची प्रक्रिया, खत देण्याची पद्धत आणि चहाचे वर्गीकरण करणे यावर या पुस्तकात उपयुक्त माहिती मिळाली. ३०३ पानांच्या या पुस्तकाचा अनुवाद आनंद अभ्यंकर या लेखकाने करून चहाबाज लोकांसाठी शौक जोखण्याची पर्वणीच दिली आहे!

#४१ लपेट लाल मातीची - लेखक पै बबन काशिद

#marathibookreview #40/2025

रोज १००० बैठका, ५०० जोर मारणे, दोन लिटर दूध पिणे, लोण्याचा गोळा खाणे, केळी आणि तुपातल्या भाज्या हा आहार !! डबल उपमहाराष्ट्र केसरी पै बबन काशिद यांची संघर्षगाथा लेखक संदीप लांडगे यांनी "लपेट लाल मातीची" या पुस्तकातून मांडली आहे. दोन वर्षांपूर्वी कोथरुडात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख यांचा सामना मी पाहिला, तेंव्हा पैलवानांचे फॅन फॉलॉवर्स केवढे त्वेषाने आपल्या गावाच्या पैलवानाला सपोर्ट करतात ते स्वतः पाहिले. स्पर्धेत भाग घेतलेले कुस्तीपटू, त्यांचे प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट टीम, बेभान आणि अत्यंत भावनिक प्रेक्षक, कॉमेंट्रेटर, माजी हिंदकेसरी - महाराष्ट्रकेसरी यांना मिळालेला विशेष सन्मान आणि माननीयांची उपस्थिती, त्यांचे संगीत मानापमान🤐 ... हे सर्व पाहिल्यानंतर पै बबन काशिद यांनी या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे राजाश्रय आणि लोकाश्रय मिळून देखील कुस्तीगीर मात्र अजूनही तिथेच बेहाल परिस्थितीत आहेत, हे मनोमन जाणवले.

पै बबन काशिद यांचा कुस्ती विश्वातला प्रवास जसा अत्यंत प्रामाणिक होता, तसाच या पुस्तकात त्यांनी प्रोफेशनल कुस्तीपटू म्हणून वावरताना केलेल्या चुका कुठलीही भीती शरम न बाळगता  सांगितल्याचे आश्चर्य वाटले. कुस्ती प्रशिक्षणादरम्यान त्यांचे वस्ताद काही कुस्ती शिष्यांना उद्देशून "का घरच्यांना फसवतोस?" हा सवाल खडाखडी चालू असताना करतात, ते वाचून या प्रश्नात कुस्तीविश्वातले किती खोल अर्थ दडलेले आहेत हे फील होते.

कुस्ती खेळ हा भारतातील ग्रामीण भागाचा धर्म आहे आणि कुस्तीपटू त्यांचे दैवत आहेत. ज्या घरात पैलवान असतो, त्या घराची गावात एक शान असते. परंतु आखाडा सोडल्यावर त्यांचे आयुष्य अत्यंत खडतर आहे. स्पर्धात्मक कुस्ती संपल्यावर आत्तापर्यंत ज्यांनी फक्त खुराक आणि लपेट, मुलतानी टांग, बांगडी, पोकळ घिस्सा असे कुस्तीचे डाव यांचाच फक्त विचार केलेला आहे, तो पैलवान दुनियेच्या आखाड्यातले डाव टाकताना सहज चितपट होतो, ही शोकांतिकाच आहे की! 

पै बबन काशिद यांची कथा वाचताना नकळत त्यांनी त्यांच्यासारखाच देशातील लाखो कुस्तीपटूंचा जीवन प्रवास मांडला आहे, असेच वाटते. MIT कॉलेज मधील त्यांची सच्ची, सोपी, कन्सिस्टंट आणि साधी नोकरीची इनिंग वाचून छान वाटते (सुरवातीला वाईट देखील वाटते). कदाचित प्रा विश्वनाथ कराड यांनी त्यांच्यातल्या याच गुणाला हेरले असावे आणि MIT मध्ये अनेक जबाबदाऱ्या दिल्या असाव्यात. 
एक मात्र नक्की ... या माणसाने आयुष्य कुस्तीभोवतीच अजूनही ठेवले आहे हे १९२ पानांचे पुस्तक वाचून समजले आणि अत्यंत आदर वाटला या खडतर बालपणातून कुस्ती जोपासलेल्या खेळाडूविषयी !

#४० पांडे पुराण - लेखक पीयूष पांडे

#marathibooskreview #39/2025

लाइफबॉय, फेविकॉल का मजबूत जोड है, वोडाफोनचा झुझू आणि तो पग कुत्रा, एम सिल (बळजबरीने केलेल्या मृत्युपत्रातल्या एक आकड्यावर गळलेला थेंब पडतो), क्लोज अप, मिले सूर मेरा तुम्हारा आणि २०१४ चे अब की बार मोदी सरकार अशा अनेक संस्मरणीय आणि ग्राहकांच्या मनाचा अचूक वेध घेणारी जागतिक जाहिरात कंपनी "ऑगिल्वी". दिग्गज जाहिरात तज्ञ आणि ऑगिल्वी इंडियाचे भूतपूर्व कार्यकारी संचालक पीयुष पांडे यांनी लिहिलेल्या "पांडेपुराण" या पुस्तकात पडद्यामागे जाहिराती कशा बनतात, सर्जनशील कल्पना कुठून जन्माला येतात, ग्राहकाच्या मनाशी जाहिराती स्पर्श कसा करतात, युनिलिव्हर किंव्हा रिलायन्स सारखे मोठे ब्रँड्स जाहिरात एजन्सीकडून काय अपेक्षा ठेवतात आणि मोकळा हात देऊन कशा परिणामकारक जाहिराती बनवतात अशा अनेक जाहिरात विषयक पैलूंचा सुरेख उलगडा केला आहे. 

पुस्तकातील तुमच्या आत दडलेले लहान मूल, संगीताची जादू, "लाला" हा फक्त शब्द नाही, अर्थाच्या आतला अर्थ आणि आयुष्याचे सिंहावलोकन ही प्रकरणे विशेष आवडली.
२५५ पानांच्या या पुस्तकाची सुरवात पीयूष पांडेच्या क्रिकेट करिअर पासून होते. पांडे रणजी खेळाडू होते हे वाचून आश्चर्य वाटले, पण क्रिकेटने शिकवलेल्या संयमाचा फायदा त्यांना व्यावसायिक कारकिर्दीत कसा झाला हे त्यांनी छान समजावले आहे. मी स्वतः जाहिरातींचा प्रेमी असल्याने मुख्य कार्यक्रमापेक्षा मला कायमच जाहिरातीत रस असतो, त्यामुळे हे पुस्तक मनापासून एन्जॉय केले😀. प्रसाद नामजोशींनी केलेला मूळ पुस्तकाचा अनुवाद बरा झाला आहे, पण महत्वाच्या मेसेजिंगचे फॉन्ट साईज जास्त करण्याचे लॉजिक मला समजले नाही.

#३९ ओपन - लेखक आंद्रे आगासी

#BookReview #Open #andreagassi 

होय, मी कट्टर सॅम्प्रास फॅन आणि स्टेफी ग्राफ आगासीच्या जाळ्यात सापडल्याचे दुःख असूनही मी आंद्रे किर्क आगासी (आका) याचे तब्बल ५९१ पानांचे आत्मचरित्र वाचले. पिस्टोल पीटच्या करकरीत सर्व्हिस तितक्याच ताकदीने परतवून लावणारा आंद्रे आगासी त्याच्या "ओपन" या पुस्तकात आपल्याला त्याचा ५ सेटचा संघर्ष प्रत्येक पानावर आठवून देतो. टेनिसचा आत्यंतिक तिरस्कार आणि टेनिस अकादमीच्या शिस्तीला विरोध म्हणून कानात डुल, रंगीबेरंगी कपडे घालून आणि मानेपर्यंत केस वाढवून टेनिस जगताला स्टाईल देणारा आंद्रे आगासी या प्रांजळ आत्मकथनात "जसा आहे तसा" दर्शन देतो. पहिल्या काही अध्यायात आपल्या सणकी बापाविषयी द्वेषपूर्ण बोलणारा आगासी शेवटच्या पानांपर्यंत पोचल्यावर त्यांचे कड्क शिस्तीचे प्रेम मोडलेले दाखवतो. आगासी कुठे म्हणत नाहीये, पण वाचकांना उलगडते की पॉप्सने आंद्रेला नंबर एकचा टेनिसपटू होण्याचे स्वप्न बघितले आणि त्यासाठी सर्व पणाला लावले. आगासीची पहिली प्रेयसी वेंडी, पहिली पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री ब्रुक्स शिल्ड पासून टेनिस जगतातील एकमेव अद्वितीय तेजस्वी स्टेफनी ग्राफ या दुसऱ्या पत्नीपर्यंतचा प्रवास लीलया उलगडून दाखवतो. जिम कोरियारला त्याने कमी लेखले हे वाचून आश्चर्य वाटले. (मी कोरियरमूळेच अनेक वर्ष पांढरी टोपी घालून फिरायचो :)) सॅम्प्रासकडून ३४ पैकी २० सामन्यात कुटल्या गेलेल्या आगासीचे पीटसमोर पाच सेटमध्ये शरण जाणे त्याकाळी मला आनंद द्यायचे, पण आता वाचल्यावर अजून दोन तरी ग्रँडस्लॅम सॅम्प्रासने आगासीला जिंकू द्यायला हरकत नव्हती असे वाटले. व्यावसायिक कारकीर्दीत तब्बल ४९ पाच सेटचे सामने खेळणाऱ्या आगासीचे विजिगीषु वृत्तीचे दर्शन या आत्मचरित्रात होते.
बाकी स्टेफी बरोबरची प्रेमकथा वाचून तुम्हाला नक्की समजेल की टेनिस सम्राज्ञीने आंद्रेला का निवडला😁.

मनात ठसणारे, खिळवून ठेवणारे, आकर्षक, रोमांचकारी आणि सुरेख अनुवाद झालेले पुस्तक .. नक्कीच वाचनीय
 👏👏. अनुवादक सुदर्शन आठवले यांचे आभार🙏

ताक: पुस्तक प्रदर्शनाला गेलो नाही, कारण मी काही रसिक वाचक वग्रे नाहीये. तरीसुद्धा २०२५ पासून प्रत्येक महिन्याला एक मराठी पुस्तक वाचून त्याचा रिव्ह्यू लिहण्याचा याठिकाणी संकल्प सोडत आहे, बघुयात यश येते का ते.🙏

#३८ गॉगल लावलेला घोडा - लेखक निखिलेश चित्रे

एकवेळ संजय रौतांची पत्रकार परिषद पहा, गेला बाजार अनन्या पांडेचा अभिनय सहन करा..😖😖 पण "गॉगल लावलेला घोडा"हे पुस्तक कृपा करून वाचू नका. 🥴🥹. कुठून अवदसा आठवली आणि मी अमूर्त संकल्पनेतील (abstract) हे  २३६ पानांचे पुस्तक वाचले राव😭😭. मराठीत अमूर्त लेखन करण्याचा कोणी याआधी प्रयोग केल्याचा माझ्या माहितीत नाही, म्हणूनच कुतूहलापोटी हे पुस्तक उचलले.
पुस्तकातील सर्व नऊ कथांमध्ये लेखक निखिलेश चित्रे  समांतर विश्वात घेऊन जातो आणि तिकडे पुढे काहीच होत नाही... कारण तिकडे काहीच नसते. 🫤🫤. छे... का हे आतार्किक पुस्तक मी वाचले!😒😒. मराठी भाषा लुप्त झालीच तर अशा पुस्तकांमुळेच होईल😡😡. एकंदरीत गॉगल लावणारा घोडा बघण्याचा नादात लेखकाने वाचकांनाच घोडा लावलाय अशी परिस्थिती आहे!! मेबेंडाझोल सिरप प्यावे लागणारे आता मला..😭😖😵‍💫🫨🤢🤒
#BookReview #गॉगललावलेलाघोडा

#३७ पुणे मर्डर क्रॉनिकल्स - लेखक मानसी सप्रे

#bookreview #punemurderchronicals 

देवकृपेने पुण्यात जोशी - अभ्यंकर आणि राठी हत्याकांड वगळता कधी फारसा खूनखराबा झाला नाही, पण "पुणे मर्डर क्रॉनिकल्स" या रहस्यमय कादंबरीत फाऊंटन पेनने स्मितहास्य कोरलेल्या सिरीयल हत्याकांडाचा कथेचा हिरो अर्थात  शोधपत्रकार चक्रधर थरारक पाठलाग करतो आणि जीवावर बेतून गुन्हेगाराचा मागोवा घेतो. प्रत्येक संशयीताकडे ॲलिबी आहे, खुनासाठी पुरेसा हेतुदेखील आहे, परंतु पोलिसांकडे भक्कम पुरावा नाही, अशा परिस्थितीत हॅकर अतिफ मयातांच्या ऑफिसातील काही धागेदोरे शोधून देतो. बाकी चकचकीत कॉर्पोरेट जगतातील दिव्या आणि नाइंटिज मध्ये अडकलेला चक्रधर यांची होऊ घातलेली प्रेमकथा या पुस्तकात संदर्भहीन असली, तरी कदाचित पुढच्या कथेत लेखिका त्याचा वापर करेल अशी आशा आहे.
मयताचे शव जुन्या पुणे मुंबई हायवे वर सापडणे, चक्रधरचा पाषाण लेक समोरील फ्लॅट तसेच प्रभात रस्त्यावरील वसुधाकुंज बंगला, कोथरूडमधील गौतमी गाडगीळचे घर, इन्स्पेक्टर पटवर्धनने संशयित मारेकरी नाईकचा पाटील इस्टेट, वाकडेवाडी येथे घेतलेला शोध, तर इनव्हेस्टमेंट बँकर कुमारला औंधमधून खूनापूर्वी पबमधून उचलणे इत्यादी सर्व कथानक पुण्यात फिरते, त्यामुळे आपल्याला ते जास्त नजरेसमोर येते...स्टोरीत जबरदस्त स्पीड आहे. मध्यंतरानंतरचे ट्विस्ट अफलातून बसलेत. लेखिका मानसी सप्रे यांनी सर्वच पात्रांचे स्वभाव आणि सवयी, गुन्ह्याची ठिकाणे आणि कथानक जिथे जिथे फिरते त्या ठिकाणची परिस्थिती याचे नेमके आणि अचूक वर्णन केल्याने पुस्तक पूर्ण ३०४ पाने वाचकांना खिळवून ठेवते!
मजा आली हे पुस्तक वाचून!

#३६ दुर्योधन - लेखक काका विधाते

#BookReview3/2025.  #दुर्योधन

भारतवर्ष सम्राट दुर्योधन महाराज जयतू जयतू 🙏

मध्यंतरी कोणीतरी मुंडेंना दुर्योधनाची उपमा दिली, त्यामुळे काका विधातेंची "दुर्योधन" ही तब्बल १०४८ पानांची अजरामर कादंबरी वाचायला घेतली. प्रत्येक पानावर महाभारतातील कौरवांची बाजू मांडणारे तार्किक आणि  रोमहर्षक वर्णन कदाचित कोणीही केले नसेल.
मुळात मी विद्रोही वृत्तीचा असल्याने कौंतेय आणि त्यांचा मायावी कृष्ण यांच्याविषयी माझ्या मनात पूर्वग्रह होताच आणि ही कादंबरी वाचून सम्राट दुर्योधन हाच धर्माने, हक्काने आणि नैतिकतेने हस्तीनापुरचा युवराज होण्यास योग्य होता हे मनोमन पटते. भ्रांतचित्ती कौंतेयांचा जन्म कुठल्याशा वरामुळे झाला वग्रे EVM छाप स्टोर्या त्या दासीपुत्र विदूराने पसरवल्या, लाक्षागृहात एका निषाद स्त्रीला आणि तिच्या पाच पुत्रांना जाळून दोष दुर्योधनावर टाकला, ही याच्याच सुपीक डोक्यातली आयडिया. द्युतात शकुनी मामांनी जरूर आपल्या कलेने विजय मिळवला असेल, पण युधिष्ठिराला देखील कौरवांच्या राज्याचा मोह होताच की!! म्हणून तर त्याने स्वतःसह बाकी कुंतीपुत्र,फुकटात मिळालेले इंद्रप्रस्थ आणि द्रौपदीला डावावर लावले. स्त्री जातीचा सर्वोच्च अपमान केला युधिष्ठिरानेच. अर्जुनाने स्वयंवरात जिंकली असताना वाटून घ्यायचा नीच निर्णय घेतला त्यानेच. अर्थात यज्ञकुंडातून जन्मली असा रंग फासून शूद्रकुलीन द्रौपदीला क्षत्रिय कुळ फुकटच मिळाल्याने स्वयंवरात सुतपुत्र संबोधून कर्णाचा आणि मयसभेत आंधळ्याचा पुत्र आंधळा अशी दुर्योधनाची निंदा करणारी उन्मत्त गुणाचीच ती!
आणि राजकीय खेळ्या करणाऱ्या माधवाने तरी कुठे कौंतेयांना युद्धनीतीने वागू दिले. आधी जसे त्याने कंसाला अंतर्गत कलहाने मारला, तसेच जरासंधाला, भीष्मांना, गुरू द्रोणाचार्य, अंगराज कर्ण, शल्याला युद्धात आणि शेवटी दुर्योधनाची हत्या देखील मांडीवर गदेने वार करून केली भीमाने!!
"अर्ध राज्यच काय, पण सुईच्या अग्रावर मावेल इतका या भूमीचा धूलिकणही मी जिवंत असेपर्यंत कौंतेयांना मिळणार नाही" इतका निग्रही गांधार नरेश होता. घनिष्ट मित्र कर्ण याच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या बळावर दिग्विजय मिळवून युवराज दुर्योधन भारतवर्षाचा सम्राट झाला होता. दूरदृष्टी राजा होता. चांगला पती होता, पुत्र होता, पिता होता. कृष्णाच्या कनिष्ठ यादव कुळात आपली लाडकी कन्या लक्ष्मणा देताना दुर्योधनाची झालेली घालमेल कादंबरीत सुरेख रेखाटली आहे. 
दुर्योधन शेवटच्या श्वासापर्यंत लढला आणि क्षत्रिय धर्म जागला. 
कादंबरी अश्वथामा पांडवपुत्रांचा नायनाट करून दुर्योधन भार्या -भानुमती आणि पौरवीला सती जाताना पाहून दूर मृत्यूच्या पूर्णविरामापर्यंत भटकंतीला निघून गेला याठिकाणी येऊन थांबते.

ही कादंबरी महाभारत हे धर्मयुद्ध नसून राजकीय युद्ध होते हे तार्किक मुद्यांवर पटवून देते. सध्या पोहताना मी सारखा या महाभारतातील कथानकाचा विचार करत असतो, इतकी ही कादंबरी पछाडून टाकते मनाला.

सरतेशेवटी, सम्राट दुर्योधन साधु साधू इतकंच 🙏

#३५ न नायक - लेखक अमोल उदगीरकर

#BookReview5/2025 #न-नायक 

मध्यंतरी एक्सेलमध्ये एक १५ मिनिटांची एकांकिका लिहिली, दिग्दर्शित केली आणि तिला चक्क द्वितीय पारितोषिक मिळाल्याचा सुखद धक्का घेऊन परत टिम्स कॉल चालू केला... Big4 वाला नेक्सस स्टडी, ट्रान्स्फर प्रायसिंग असल्या अगम्य विषयावर आभाळ हेलपत होता. व्हिडिओ आणि माईक ऑफ करून, त्या टायघाल्याला (मनातल्या मनात) शिव्या घालून का आपण हे सडकछाप काम करत बसलोय आयुष्यात असे पुटपुटलो. मोबाईलवर सर्च करताना "न-नायक" हे अमोल उदगीरकर या नवेदित लेखकाचे २३२ पानी पुस्तक दिसले. न- नायक म्हणजे अभिनयात क्षमता असून देखील तिन्ही खान्स, कपूर्स, देवगण, अक्षय कुमार, माधुरी, जुही, श्रीदेवी यांसारखे टॉपला, क्रमांक एकला पोचू न शकणारे/ शकलेले आमच्या अजित दादांसारखे दुःख खांद्यावर घेऊन फिरणारे नायक - नायिका! यातील बरीचशी नावे गेल्या दहा वर्षात बॉलिवूडमध्ये झळकली आहेत आणि मी बापडा 90s मध्येच अडकलो असल्याने अपवाद वगळता मला ते सर्वच सो सो वाटतात.
जिमी शेरगीलच्या कहाणीत लेखकाने सांगितल्याप्रमाणे राजबिंडे रूप, खणखणीत अभिनय ही जमेची बाजू जरूर आहे, पण रुपेरी पडद्यावर कॅमेरा फेस करण्याचे तंत्र सर्वच थिएटर कलाकारांना जमते असे नाही. मुळात हिरो या मंडळींनी स्वतः ला आतून समजले पाहिजे. करिष्मा, माधुरी सेटवर जो सम्राज्ञी स्टाईल घेऊन फिरायच्या त्याच्यापुढे आजकालच्या सेम सेम चेहऱ्याच्या ड जीवनसत्त्वाची कमी असलेल्या कुपोषित नायिका २% देखील नाहीत.
बाकी बोमन इराणी, जॉनी लिव्हर ही नावे पुस्तकात फक्त लक्षवेधी ठरण्यासाठी असावीत. पुस्तकातील अक्षय खन्नाची (ज्याचा "डोली सजाके रखना" हा सुरेख पिक्चर बॉक्स ऑफिसवर त्याकाळी मी दोन वेळा जाऊनही आपटला होता हे स्टारडस्टला वाचून दुःख झाले होते) स्टोरी मान्य करू देखील, पण तो 90s मधला हाणा मारा बदडा टाईप हिरो न्हवता की शारक्या सारखा क क किरण वाला दिलाची भिका मागणारा हिरो, हे ही तितकंच खरं.  त्यामुळे तो क्रमांक दोन काय, दहामध्ये देखील आला नाही. दामिनी हा मीनाक्षी शेषाद्रीला केंद्रस्थानी ठेऊन आणि ऋषी कपूरसारख्या प्रस्थापित हिरोला घेऊन केलेला चित्रपट ब्लॉकबस्टर झाला तो सनी देओलमुळे!! सुपरस्टार होण्यासाठी फक्त अभिनय नाही तर मिथुनसारखा कल्ट,गोविंदा सारखा स्क्रीन प्रेसेन्स, शाहरुख - माधुरी सारखा स्टारडम रक्तातच असावं लागते. न- नायकांचे दुर्लक्षिलेपण हे त्यांच्या आतच दडले आहे असे माझे मत आहे.

खरं सांगायचं तर क्षमता असून देखील लेखकाला या पुस्तकात फड जमला नाही असे माझे प्रामाणिक मत झाले आहे, त्यामुळे १० पैकी ६ गुण फक्त. लेखक 90s किड आहेत, त्यामुळे त्याने 90s च्या फिल्मफेअर अवॉर्ड्सवरती काहीतरी छान लिहावे ही इच्छा आहे.

#३४ १६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब- लेखक सुरेश वांदिले

#bookreview #6/2025  #१६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब

"नेहरूंच्या ११५ घोडचुका" हे येत्या काळात लवकरच अजरामर होणारे पुस्तक वाचताना जरा डोक्याच्या तवा गरम झाला, त्यावर ब्रेक म्हणून " १६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब" हे १४५ पानांचे छोटेखानी पुस्तक वाचून काढले.

सन १६९५ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या ' जंग - ई सवाई ' हे अफाट संपत्ती वाहून नेणारे हज - सुरत मार्गावरचे जहाज हेन्री अव्हेरी या इंग्रज समुद्री चाच्याने लुटले. आलमगीर यामुळे प्रक्षुब्ध झाला, पण तरी पण त्याने या जहाजाचा आणि अव्हेरीचा शोध घेण्याचा फारसा रस दाखवला नाही!!  नक्की काय झालं सप्टेंबर १६९५ साली??, या उत्सुकतेपोटी टिल्लू रंगनाथ रणखांबे या किशोरवयीन मुलाने मशीन लॉर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शोध घ्यायचा ठरवला, असे विलक्षण कथासूत्र आहे या कादंबरीत. या कामात त्याला शोधकार्य चालू असताना कैलासवासी झालेला रोबो ' स्पॉट ', महाजालातील औरंगजेब विषयावरची लाखो पाने - माहिती (जी कृत्रिम बुद्धिमत्तेने रोबो, अलेक्सा हे क्षणात वाचून काढतात) आणि टिल्लूचे वडील कॉम्प्युटर शास्त्रज्ञ वडील मदत करतात.
लेखक सुरेश वांदिले यांनी बाजीराव गुप्तेंचा अपघात, पोलिस तपास हे कथानकात घुसडल्याने पुस्तक फसेल असे वाटत असतानाच शेवटला गरकन गाडी रुळावर आणली आहे. कथा १२५ पानापर्यंत उत्कंठा जागृत ठेवते हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
नवीन पुस्तक आहे, मुखपृष्ठ, कागदाची गुणवत्ता राजहंस प्रकाशनाचे असल्याने चांगली ठेवली आहे.

मजा आली... आता जातो नेहरूंच्या मागे परत😾🫨🫤😾😾🏃🏽🏃🏽

#३३ बायकोचा मरण सोहळा - लेखक शेखर गजभार

#marathibookreview #7/2025 #बायकोचामरणसोहळा

"बायकोचा मरण सोहळा" या चमको नावाचा विनोदी कथासंग्रह वाचला. १७२ पानांच्या या पुस्तकाची सुरवात पुलांच्या स्मृतीस अर्पण करून झाली असल्याने काहीतरी हसवणारे हटके वाचायला मिळेल ही अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात हलक्या फुलक्या कथा ज्यात, बायकोच्या कुंडलीत मरणाची तारीख लिहिली असते, त्यामुळे कुटुंब आणि रमेशची बायको स्वतः ललिता, हे या शेवटच्या दिवसाची तयारी कशी करतात, ही एक कथा आहे. त्या कथेचे नाव आहे "बायकोचा मरण सोहळा". कदाचित फेसबुकवर वात्रटपणा, ट्रोलबाजी याचा शौक लागल्याने या पुस्तक वाचनात प्रयत्न करून देखील हसता आले नाही त्याबद्दल लेखक शेखर गजभार यांची दिलगिरी 🙏.
ठीक आहे, तसेही पुस्तक लिहणे हे अतिशय कष्टाचे काम आहे... आणि त्यात विनोदी लिहिणे तर अत्यंत कठीण काम!! त्यामुळे नवीन लेखकांनी प्रयत्न करत राहावे, आम्ही वाचक नक्कीच त्यांना साथ देऊ 🙌💪

#३२ नेहरूंच्या ११५ घोडचुका -लेखक रजनीकांत पुराणिक

#marathibookreview #8/2025

"नेहरूंच्या ११५ घोडचुका" हे पुस्तक जर माझ्या हाती ५ - ७ वर्षांपूर्वी लागले असते, तर राकु, गोखले, दीक्षित, गौरव पवार टाईप IT Cell च्या पोरांना मोबाईलची धूळ पुसायला ठेवले असते, इतका खजाना या पुस्तकात भरलेला आहे😎💪🏼.  लवकरच अजरामर होऊ घातलेल्या या पुस्तकात नेहरूंना लेखकाने तुडव तुडव तुडवला आहे.🫨🫨 दोन पाच फळकुटं गांधीजींना देखील फेकून मारली आहेत. माउंटबॅटनची तर सुरेश ढसांच्या खोक्याने बॅटीने एकाला मारला, त्या लेव्हलची धुलाई केली आहे या पुस्तकात.

सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ प्रसाद, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, रफी किडवाई, जिना, लियाकत अली, राजाजी अशा अनेक त्याकाळच्या नेते, विचारवंत, सनदी आणि सैन्य अधिकारी आदी लोकांनी लिहिलेली पुस्तके, नोंदी आणि पत्रे इत्यादींच्या सखोल अभ्यासानंतर, लेखकाने नेहरूंच्या ११५ चुका अत्यंत त्वेषाने मांडल्यात. सरदार पटेलांनी निवड झाली असताना मागे हटून नेहरूंच्या गळ्यात पंप्र पदाची माळ गळ्यात घातली आणि त्यांच्या इतर अनेक निर्णयांना, प्रस्तावांना, अँटी समाजवादी विचारांना नेहरूंनी कात्रजचा घाट दाखवला असे पुस्तकात वाचण्यात आले...पण यावरून लोहपुरुष हे 'टॉप लीडर' होण्यास योग्यतेचे नव्हते असेच माझे मत झाले. त्यापेक्षा आपले मोदीशा असते, तर नेहरू - गांधीना मार्गदर्शक मंडळात बसवून दर १४ नोव्हेंबरला 'भाई का बड्डे' सांगून फोटो काढले असते...वर आंबेडकरांकडून नवीन घटना (मनुस्मृती आधारित) आधीच लिहून घेतली असती😒.

असो, लेखक रजनीकांत पुराणिक यांनी जीव तोडून हे ५२७ पानांचे नक्कीच असे वाचनीय पुस्तक लिहिले आहे. वाचकांना नेहरूंच्या चुका (ज्या  स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्याच चुका समजल्या जातात/जातील) वाचताना खूपच वेदनादायी वाटतात, नेहरूवादाचा राग येईल आणि भारतासाठी हळहळ देखील वाटेल इतक्या प्रभावीपणे  नेहरूंच्या चुकांची पुराव्यासह मांडणी केली आहे.
अर्थात बाकी काही असो, तीन वेळा या "अनभिज्ञतेच्या नवाबाला" आपण भारतीय जनतेनेच तर निवडून दिलंय हे विसरून कसे चालेल !!

जाता जाता ११५ व्या घोडचुकेत नेहरूंना बिड्या शिलगावून देणाऱ्या आणि नेहरूंवर लव्ह करण्याचा 'आरोप' असलेल्या आपल्या लाडक्या एडविना माउंटबॅटनला लेखकाने उगाच थोबडवला आहे😭😭.

Sunday, November 16, 2025

#३१ गोल्डा - लेखिका वीणा गवाणकर

#marathibookreview #9/2025 #गोल्डा 

गोल्डा मेयर या पहिल्या इस्रायली महिला पंतप्रधानांवर ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहलेले हे एक खणखणीत पुस्तक. ३१४ पानांच्या या पुस्तकात वीणा ताईंनी एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबात जन्मलेल्या गोल्डा मेयर या कणखर, धाडसी, मुत्सद्दी इस्रायली नेत्याचे सुरेख व्यक्तीचित्रण केले आहे.

पुस्तक कायम आत्यंतिक ज्यू द्वेष सहन करणाऱ्या जगभरातल्या ज्यू लोकांनी गोल्डा आणि डेव्हिड बेन गुरियान (इस्राएल राष्ट्र संस्थापक) यांच्याद्वारे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे वर्णन करते. इस्राएलच्या जन्माआधीपासून आणि नंतरही ग्रेट ब्रिटनने* कायम खंजीर खुपण्याचे काम केले, त्याला फक्त परराष्ट्रमंत्री गोल्डाच कायम काटशह देऊ शकली !! 
किचनमध्ये स्वतःच्या हाताने आपल्या मंत्र्यांना खायला करून घालणाऱ्या आणि तिथेच राजकीय खेळी आखणाऱ्या, राष्ट्रहिताचे निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान गोल्डा मेयर विशेष वाटतात (जरी त्याला "किचन कॅबिनेट" असे उपहासाने विरोधक म्हणत असले तरी).
अमेरिकेच्या नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट मध्ये गोल्डा यांचे पोर्ट्रेट लाऊन त्यांचा उचित सन्मान केला आहे असे वाटते.

*जगभरात भांडणं लावणारे इंग्लंड त्यांचे भोग नक्कीच भोगत आहे, काल परवाच पाकिस्तानी मुल्ला इंग्लंडचा शिक्षण मंत्री झालाय, ही त्याचीच तर नांदी असेल काय?😃

#३० द काईट रनर - लेखक खालिद हुसेनी

#marathibookreview #10/2025 #दकाईटरनर 
खरं तर खालिद हुसेनी यांची The Kite Runner ही गाजलेली इंग्रजी कादंबरी "आयुष्यात एकदा तरी वाचलीच पाहिजे" असा सल्ला माझ्या १४ वर्षाच्या कन्येने दिला, पण पहिल्या वीस पानातच माझा उमर अकमल झाला (तात्यासाहेब वीरकर डिक्शनरी वापरून देखील). त्यामुळेच वैजयंती पेंडसे यांनी मराठीत अनुवाद केलेली ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचण्याचा निर्णय घेतला.

अफगाण अमेरिकी लेखकाने पहिल्या पानापासूनच कथेत जी पकड धरली आहे, ती शेवटच्या पानापर्यंत उत्कंठा ताणून धरते. बहुतेक अमेरिकी लेखक हे शहराचे, रस्त्यांचे, पानफुलांचे आणि विशेषतः माणसाच्या शरीररचनेचे आणि मानसिक स्थितीचे वर्णन करण्यात निष्णात असतात. या कादंबरीत देखील अफगाणी पश्तून आणि हाजरा लोकांचे स्वभाव, तसेच काबुल - जलालाबाद - पेशावर येथील घाटातील अत्यंत कठीण रस्ते, आमिर आगाचा टँकरमधला प्रवास, काबुलमधील प्रतिष्ठित पंतगबाजीमध्ये हसन या आपल्या मागकाढ्या हाजऱ्याच्या(नोकर) साथीने कमावलेला(?) तो निळा पतंग, सोरायाबरोबरची हलकी मजेशीर प्रेमकथा, काबुलच्या भग्न रस्त्यांवर आठवणी शोधणारा आमिर आणि अशा अनेक घटनांनी लेखक पूर्ण ३४२ पाने वाचकांना खिळवून ठेवतो!! 
छोट्या सोहराबने क्रूरकर्मा तालिब आसिफचा डोळा फोडला हे वाचताना आनंद खूप होतो. त्यामुळेच तर "आमिर - हसन काबूलचे सुलतान" हे सत्यात उतरते🤩अफगाणी आपुलकीची/स्नेहभावाची आणि सतत गुंतवून ठेवणारी, पाठलाग करणाऱ्या लक्षवेधी प्रतिमांची रेलचेल असणारी ही कादंबरी वाचकांना पूर्ण समाधान देते.
या अतिशय अवघड इंग्रजीतल्या कादंबरीचे मराठीत अनुवाद केल्याबद्दल वैजयंती पेंडसे यांना दंडवत 🙏

#२९ पोलिस फाईल्स २ पुणे पोलिसांच्या लक्षवेधी तपासकथा - लेखिका/संपादन तृप्ती कुलकर्णी

#marathibookreview #11/2025 #पोलिस फाइल्स २

पोर्शे प्रकरण, कोयता गँग, अमली पदार्थ तस्कर बादशाह ललित पाटील, स्वारगेट बलात्कार किंव्हा मोहोळचा कोथरूडात आणि अंदेकरचा कसब्यात झालेला गेम, या आणि अनेक प्रकरणामुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर सर्वजण तुटून पडलेले असतातच. पण पोलिस हजारो केसेस अत्यल्प साक्षी पुराव्यांच्या बळावर देखील सोडवतात यावर कोणी कधीच बोलत नाही. पोलीस फाईल्स - भाग २ हे लेखिका तृप्ती कुलकर्णी यांनी संपादन केलेले पुणे पोलिसांच्या २५ लक्षवेधी तपासकथांचे छान पुस्तक आहे. भाग एक काही वर्षांपूर्वी वाचल्याचा माझ्या स्मरणात होताच. खरं तर पोलिस स्टेशनात आलेल्या प्रत्येक तक्रारीचा गुन्हा दाखल केला, तर पुढची तारीख सात जन्मानंतर येईल इतके आपल्या देशात भांडणतंटे रोज होत असतात. म्हणूनच प्रत्येक ठाणे अंमलदाराच्या खोलीबाहेर एक बाकडं असते, ज्यावर बसून फिर्यादी आणि आरोपी दोघेही साहेब राऊंडला जाऊन येईपर्यंत आत्मचिंतन करतात आणि ९८% तंटे तिथेच मिटतात😝🙏.

पुणे पोलिसांनी आपल्या प्रसंग चातुर्याने, अनुभवाने, खबरी नेटवर्कद्वारा, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर आणि विलक्षण धैर्य दाखवून या पुस्तकात कथन केलेल्या केसेस सोडवल्या आहेत. ड्यूटीमुळे सगळ्याच सणांना तिलांजली देऊन ऑटोमॅटिक नास्तिक झालेल्या सर्वधर्मीय पोलिसांचे कामाचे आयुष्याची झलक या तपास कथांमधून मिळते. एकही चौकीत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी किमान एक स्वच्छ टॉयलेट देऊ शिकत नाही इतकी किंमत सरकार "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" बॅच घेऊन फिरणाऱ्यांची ठेवते, ही शोकांतिकाच म्हणावी आपल्या महाराष्ट्रात तरी..
२०० पानांच्या या पुस्तकात लेखिकेने अपहरण, नवरा बायकोचे तंटे, ऑनलाइन फसवणूक, मर्डर, भेसळ, तडीपार अशा अनेक तपासकथा अलगद उलगडवून सांगितल्या आहेत.
मजा आली या वर्षातले हे ११ वे मराठी पुस्तक वाचून !😇😄.

#२८ नागासाकी - लेखक क्रेग कोली

#marathibookreview #12/2025
असं म्हणतात की " अमेरिकेशी वाकडं, त्याची चुलीवर लाकडं". 'नागासाकी' ही क्रेग कोली यांनी लिहलेली आणि डॉ जयश्री गोडसे यांनी मराठीत अनुवाद केलेली सत्यकथा वाचल्यावर युद्धात अमेरिका जिंकण्यासाठी कुठल्या(?)ही थराला जाऊ शकते याचा अंदाज येतो.
हिरोशिमावर ६ ऑगस्टला पहिला अणुबाँब टाकल्याच्या घटनेपासून या ३४५ पानांच्या पुस्तकाची सुरवात होते. पुढच्या तीन दिवसात, म्हणजेच ९ ऑगस्टला फॅटमॅन नामक अणुबाँब डोक्यावर फुटण्याआधीचे नागासाकीतल्या सामान्य जपानी नागरिकांचे आयुष्य लेखकाने छान रंगवले आहे. त्याचबरोबर जर्मनीच्या बिनशर्त शरणागतीनंतर जपानला गुढगे टेकायला लावण्यासाठी दोस्त राष्ट्रातील राजकीय डावपेच यावर देखील प्रकाश टाकला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकी अध्यक्ष ट्रुमन यांच्याविषयी या पुस्तकामुळे नक्कीच पूर्वग्रह होऊ शकतो. तात्या नेहमीच म्हणतात ना - डेमोक्रॅटिक नेते युद्धपिपासू आहेत, १९४५ देखील याला अपवाद नव्हता. स्टालिन आणि रशियावर करायची कुरघोडी, जपानी सैन्य आणि माध्यमे यांनी हिरोशिमा स्फोटाची भीषणता कमी दाखवण्याची केलेली घोडचूक आणि जपानी माणसाकडे असलेले राष्ट्रप्रेम, शिस्त, संकटकाळी एकमेकांना मदत करण्याची वृत्ती याचे यथार्थ दर्शन या पुस्तकात घडते.
लिटिल बॉय आणि फॅट मॅन हे दोन अणुबाँब जपानने झेलून, त्यातून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली हे जरी प्रेरणादायी असले, तरी निरपराध जपानी नागरिकांचा निरंकुश संहार, किरणोत्सारामुळे झालेला त्रास हे येथे मांडू देखील शकणार नाही इतके भयावह वर्णन पुस्तकात वाचायला मिळाले. अणुबाँबचा प्रहार जमिनीवर झाल्यावर काही सेकंदात जिवंत माणसे राख झाली, कपडे जळून काहींची कातडी निघून हातात आली तर डोक्यावरचे केस क्षणात जळून, सकाळी पांढरेफटक पडलेले नागासाकी नागरिक संध्याकाळ होताहोता निळे काळे पडले. एका क्षणात दोन शहरे बेचिराख केली या बॉम्ब्सने!! खरं तर हे बॉम्ब अंगावर घेऊन आणि त्याचे परिणाम जपानने जगाला दाखवून, थोर उपकारच केले आहे. किमान कोणी सरफिर्या हुकुमशहा असे कृत्य परत करणार नाही ही प्रार्थना करूया🙏

कदाचित युद्धात पाशवी आणि क्रूर पद्धतीने वागणारे जपानी या दोन अणुबॉम्बच्या तडाख्यानंतर आमूलाग्र बदलला असावा, असे मला वाटते. त्यामुळे फक्त ४०० अब्ज डॉलर अमेरिकेने मदत केल्याने जपान विकसित झाला हे म्हणणे योग्य नसावे. वाचनीय !!

#२७ डायरी ऑफ ए होम मिनिस्टर - लेखक अनिल देशमुख

#marathibookreview #13/2025

गेल्या आठवड्यात सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या "डायरी ऑफ होम मिनिस्टर" या पुस्तकावर बंदी आणण्याचा विचार करत आहे असे ऐकले...त्यामुळे तातडीने ही " राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा" वाचायला घेतली. पुस्तकाची सुरवात अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या बेवारस स्कॉर्पिओपासून सुरू होते. नंतर पुढची किमान १६० पाने कोर्टात सादर केलेली प्रतिज्ञापत्र, सीबीआय - ईडीने दाखल केलेली चार्जशीट छापून काढली आहेत, ज्यात सचिन वाझे आणि परमबीर सिंह हेच अँटीलिया जिलेटीन कांड आणि १०० करोड खंडणी वसुलीच्या उद्योगात दोघे सूत्रधार आहे, मी तर साधा भोळा मॅन आहे, मला काही माहिती नाही वर्ग्रे वर्ग्रे !
**पुस्तकातील मला न पटलेल्या गोष्टी** -
१) परमबीर सिंह हा सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि काही पानांनंतर तोच थरथर कापत होता. वास्तविक जॉइंट कमिशनर फोन करून ही आधी बातमी कळवतो, या एकाच मुद्द्यावर कमिशनरला मुर्गा करून बसायला लाऊ शकतो होम मिनिस्टर, इतकी पॉवर असते त्याच्याकडे. वर म्हणे निलंबित एसीपी वाझेला १६ वर्षांनंतर पोलिस सेवेत घेण्याच्या मीटिंग मध्ये मी होतो, पण निर्णय कमिशनरने घेतला, मी त्याला ओळखत पण नाही😝. कोण आहे हा चौधरी वकील 🤦.
२) संजय राऊतांनी त्यांना हे पुस्तक लिहायला सांगितले आणि पवार साहेबांनी कपिल सिब्बल नावाचा प्रथित -अपयशी वकील करून दिला. या दोघांच्या नादाला लागलं की बाजार उठलाच समजा😭🤦.
**पुस्तकातील पटलेल्या गोष्टी** -
१) माजी मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह फरार झाला हेच कारण त्यांचा किमान १०० करोड वसुली टार्गेट आणि मनसुख हिरेन हत्याकांड या दोन्ही प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे संशय निर्माण करते.
२) सचिन वाझेला ईडीने माफीचा साक्षीदार बनवणे.

२०० पानांनंतर कोणीतरी देशमुख साहेबांना ते आत्मकथन लिहित आहात, याची कदाचित आठवण करून दिली. पण देशमुख साहेबांचा आयुष्यातला स्ट्रगल हा माझ्या आणि अनन्या पांडे लेव्हलचाच असल्याने, विदर्भातील वाडविहिरा गावच्या पाऊलवाटा, असे कसे तरी दोन पानात गुंडाळून टाकण्यात आले😑😑😭.
**पुस्तकात नमूद खळबळजनक गोष्टी** -
१) देशमुख, संजय राऊत, भोसले, गरवारे आणि आमचे आधारवड साहेब यांच्या पापा की परींनी ED Girls नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप काढला आहे.🫤🥹🧐. 
२) विजय माल्यासाठी आर्थर रोड तुरुंगातील एक बराक रंगरंगोटी करून लंडन न्यायालयाला भारतीय तुरुंगातील मानवतावादी कंडिशन्स फोटो काढून दाखल केले आहेत🥲😜

२६० पानांच्या या पुस्तकात "किंबहुना" हा विश्वातील क्रमांक एकच्या मामुंचा पेटंट शब्द वारंवार वापरण्यात आला आहे. तरी सरकारला मी खालील नम्र विनंत्या करतो -
१) रद्दी पुस्तक आहे, उगाच बंदी वर्ग्रे वेळ घालवू नका.
२) काम्राच्या प्रेक्षकांना समन्स लावलं, तसे हे पुस्तक वाचल्यावबद्दल माझ्यावर बेकायदेशीर कायद्याची कारवाई करू नये... कारण मी भाजप कार्यकर्ता आहे. (खरंच पक्षाचे आयकार्ड आहे माझ्याकडे 😭😭).
३) देशमुखांनी तुरुंगातील भयंकर परिस्थिती त्यांच्या ४२२ दिवसातल्या निवासात अनुभवल्या आहेत. विनंती आहे की यापुढे कोणालाही तुरुंगात टाकायच्या आधी तुरुंग-रंग हे पुस्तक वाचणे बंधनकारक करावे. गेला बाजार, या पुस्तकाचे लेखक आणि माझे मित्र माजी आयपीएस अधिकारी पाटील सर यांनी Udemy वर एक सर्टिफिकेट कोर्स घ्यावा भावी तुरुंगवासियांचा 🙏

#२६ झुळूक अमेरिकन तोऱ्याची - लेखक शरद वर्दे

#marathibookreview #14/2025

"झुळूक अमेरिकन तोऱ्याची" हे धमाल पुस्तक वाचले. जवळपास १२ वर्षे झाली असतील मी शेवटचे अमेरिकेला जाऊन. पण माझ्या आठ दहा अमेरिका वाऱ्यांमध्ये माझी जी काही त्रेधा तिरपीट झाली ती या १९५ पानी पुस्तकात लेखक शरद वर्दे यांनी तंतोतंत रेखाटली आहे म्हणेन. खरंच अमेरिका हे अदभुत रसायन आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस स्वत्व विसरून अल्पावधीतच अमेरिकन बनतो. त्याची भाषा बदलते, पेहराव बदलतो, दृष्टिकोन आणि सवयी बदलतात.
ग्रीनकार्डहोल्डर (ज्याला लेखक श्री व सौ हरितपत्रिका धारक म्हणतो), व्हॉईसमेल, अमेरिकन इंग्रजी आणि त्याचे उच्चार, इलेक्ट्रॉनिक स्वयंचलित उपकरणे (विशेषतः कोळंबी सोलायचे यंत्र😝), अचानक उगवणारे अतिथी देवो न भव आणि अशा अनेक भारतीय अमेरिकी जीवनाचे अंतरंग लेखक उलगडवतो त्याला तोड नाही.
प्रत्येक वर्णनात खळखळून हसवणारा लेखक १८० व्या पानावर मात्र अमेरिकेत हरितपत्रिका मिळालेला मुलगा आणि सून यांचे 'इंडियन गार्बेज' झालेल्या आणि इकडे भारतात एकटे पडलेल्या वृद्ध आईवडिलांसाठी पंचतारांकित वृद्धाश्रमाची व्यवसाय कल्पना करतो ते वाचून हळहळ वाटते. आश्चर्य वाटेल, पण २०१२ साली लिहिलेल्या या पुस्तकातील हे शब्द यंदा १३ वर्षांनी पुण्यात परांजपे बिल्डरने रु ६५००० प्रति महिना भाड्याने काढलेल्या 'अथश्री' मॅनेज ओल्ड होम्स स्कीममध्ये खरे करून दाखवलेच की!!
अर्थात भारतीय अमेरिकी लोकांच्या जीवनातील अनेक पैलूंचा सकारात्मक विचार हे पुस्तक करायला नक्की लावेल. 

सर्वच अमेरिकी भारतीय आणि बी1/बी 2, H1, L1 व्हिसा आणि भावी हरितपत्रिका धारकांनी वाचनीय असे हे पुस्तक !!

Saturday, November 15, 2025

#२५ मिस्टर अँड मिसेस जिना - लेखिका शीला रेड्डी

#marathibookreview #15/2025

"मिस्टर अँन्ड मिसेस जिना" हे पुस्तक पेहेलगामच्या आधी वाचायला घेतले होते. कैद - ए-आझम बॅरिस्टर जिना आणि त्याच्याहून २४ वर्षाने लहान असलेल्या मिस रट्टी पेटीत या अतिश्रीमंत पारशी व्यापाराच्या कन्येशी झालेल्या आंतरधर्मीय धक्कादायक विवाहाची ही कहाणी सुरू होते ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या, चेहऱ्यावर खत्रुड भाव ठेवणाऱ्या ख्यातनाम वकील मोहम्मद जिना आणि रट्टीच्या प्रेमकहाणीने, सर दिनशॉ पेटिट यांनी कोर्टातून जिनांना आपल्या कन्येशी विवाह करण्यासाठी आणलेला मनाईआदेश, नंतर धर्मांतर, रट्टीचा जिनांबरोबरचा राजकीय प्रवास, नंतर तिचा स्वैर बेफिकीर उच्चभ्रू आयुष्याचा आनंद, जिनांचा गांधीजींवर कुरघोडी करण्याचा सततचे अयशस्वी प्रयत्न इत्यादी... मात्र ही शोकांतिका संपते मिसेस रट्टनबाई जिना यांच्या वेदनादायी मृत्यूने !! 
लेखिका शीला रेड्डी यांनी बॅरिस्टर जिना यांचे सचिव छागल , सहकारी कांजी आणि मुख्यतः सरोजिनी नायडू (ज्यांचे जिनांबरोबर घरचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते) यांच्या पत्रांच्या, नोंदींच्या आधारावर हे ३०० पानी पुस्तक लिहिले आहे, जे वाचकांना खिळवून ठेवते.

या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे जिना स्वतःला धार्मिक नेता समजत न्हवते, त्यामुळे रट्टीसोबतच सिगरेटी फुकणे, रात्रभर दारू पिणे किंव्हा हॅम सँडविच खाणे असेल...  सौंदर्याची खाण असलेल्या रट्टीला बिना बाह्याचा ब्लाऊज घालून फॅशनेबल वाईफ घेऊन स्वतःला आधुनिक मुसलमान म्हणवता आले. यायला पाकड्यांचा राष्ट्रपिता असा इस्लाम निषिद्ध राहिला आयुष्यभर, एकमेव बायकोला पण छळले नाही, उलट तिच्या स्वच्छंदी वागण्याला पैसे पुरवले आयुष्यभर... आपल्याकडे गांधीजींनी असे काही केले असते तर त्यावेळेलाच बाजार उठवला असता.
अर्थात मिस्टर अँड मिसेस जीनांच्या एकुलत्या एक कन्येने दिना पेटिटने जिनांच्या विरोधात जाऊन पारशी बिजनेसमन निविले वाडियांशी मुस्लिम लीगच्या ऐन उमेदीच्या काळात विवाह करून नियतीने हिशोब पूर्ण केलाच.
बाकी बॅरिस्टर जिना आणि मिसेस रट्टनबाई जिना यांचे एकमेकांवर निस्सिम प्रेम होते याचे अनेक दाखले पुस्तकात सापडतात. वरवर पाषाण हृदयी, निष्ठूर आणि निर्दयी वाटणारे जिना सरोजिनी नायडूंनी त्यांच्या कायम स्वरुपी आरक्षित ताज हॉटेलातील खोलीतून लिहिलेली पत्रे, ते आतून किती हळवे होते याचा अंदाज देतात.

पुस्तकात जिनांचे फार काही कौतुक लिहिले नाहीये (तो उद्देशदेखील नाहीये), परंतु जिना अफाट कष्टाने वकिलीत आणि राजकारणात उंचीवर पोचले आणि इंग्रजांविरुद्ध त्वेषाने लढले हे निश्चितच जाणवते.

फाळणीनंतर "बाबा-ए-कौम" जिनादेखील एकच वर्षात मरण पावले. कदाचित आफ्रिकेतून अचानक आपल्या राष्ट्रपिता गांधीजींचा भारतीय राजकारणात प्रवेश झाला नसता, तर जिना नेहरूंना टक्कर देणारे प्रगतिशील मुसलमान नेते झाले असते आणि पाकिस्तान आज जे आहे, ते कदाचित नसते. सगळ्या जर-तर च्या गोष्टी, असो😄.

#२४ मरणात खरोखर जग जगते - लेखक डॉ तारा भवाळकर

#marathibookreview #16/2025

दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांचा "मरणात खरोखर जग जगते" हा  (रड)कथासंग्रह वाचला... भंगार, डबडा पुस्तक माझ्यावर भानामती झाल्यानेच वाचायला घेतले असे शेवटच्या १५८ व्या पानाला वाटले😖😖.
तर या विश्वख्यातनाम लेखिका ज्यांचे नाव मला २०२५ साली माहिती झाले, त्यांनी या पुस्तकाच्या सुरवातीला मनोगत लिहिले आहे. यायला अशोक दिंडा स्वतःला सचिन तेंडुलकर समजून जसे रिटायरमेंट स्पीच देईल तसे फिलिंग आले😭. 
पुस्तकात सर्व अलका कुबल टाईप, म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या जगातल्या आणि आयुष्यातली खोली समजवण्याच्या तब्बल १६ छपरी स्टोऱ्या लावल्यात😭😖🫩😭😡, जे माझ्या व्यक्तिमत्वाच्या अर्थात उलट आहेत!

जाऊदे, त्यापेक्षा मी उद्याच्या ब्लॅकआउटवर एकाला "ब्लॅकआउट कसा आउटडेटेड आहे" ही पुरोगामी पोस्ट लिहून देतो आणि दुसऱ्या एका प्रतिगाम्याने मागितल्याप्रमाणे "ब्लॅकआउट दरम्यानच्या काळातील सुसंधी" यावर दीर्घ लेख लिहितो🫨🫠🚶🏼‍♂️🚶🏼‍♂️🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️. आणि उद्याच्या मॉकड्रीलची अजून तयारीही झाली नाहीये माझी काही🫤🫤.

#२३ फॅक्टरी गर्ल्स - लेखक लेस्ली टी छांग

#marathibookreview #17/2025
फॅक्टरी गर्ल्स (लेखिका - लेस्ली टी. चांग, अनुवाद - गौरी देशपांडे) हे यावर्षातील सतरावे मराठी पुस्तक!
चीनमधील कारखाना कामगार महिलांच्या खेड्यातून शहराकडे स्थलांतरित जीवनावर आधारित अनेक कथा लेखिकेने रेखाटल्या आहेत. चायनामध्ये ९० च्याच दशकात ज्या झपाट्याने औद्योगीकरण झाले, त्यात कामगारांचे कसे शोषण झाले यावर पुस्तक प्रकाश टाकते. डोंगगुआनच्या कारखान्यांमधील तरुणींचे संघर्ष आणि आकांक्षा दाखवताना अनेक कथा रटाळ आणि जास्त तपशीलपूर्ण वाटतात (कदाचित अमेरिकी लेखक खूप जास्त डिटेलिंग करतात त्यामुळे स्टोरी हरवते असा माझा बरेचवेळेचा अनुभव आहे). पुस्तक जागतिक अर्थव्यवस्थेतील त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकते, पण त्यात नवीन काही वाटले नाही. मुळात, त्या चपट्या जिंग्यांच्या (#मुडदा-बाशिवला चीनचा 😡) देशाचे मला फार कौतुक नाही.  काहींना हे पुस्तक प्रेरणादायी वाटले असले तरी सतत फिरणाऱ्या कथा वाचकांनाच हरवून टाकते, असे मला वाटले.
एकंदरीत, हे सलग दुसरे पुस्तक माझ्यासाठी कंटाळवाणे ठरले. असो.

Tuesday, November 11, 2025

#२२ काश्मीर आणि काश्मिरी पंडित -लेखक अशोक कुमार पांडेय

#marathibookreview #18/2025

काश्मीर इतिहासाचे आणि समकालीन घटनांचे तज्ञ, शोधपत्रकार अशोक कुमार पांडेय यांनी ३७० कलम हटवल्यानंतर लगेचच लिहलेले "काश्मीर आणि काश्मिरी पंडित" हे जबरदस्त पुस्तक वाचले. 
काश्मीर मधील इतिहास - वर्तमान - भविष्य हे भयावह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अंतरद्वंद्वाने भरलेले आहे हे पुस्तक वाचून नक्कीच वाटेल. काश्मिरच्या जन्मापासून म्हणजेच कश्यप ऋषींच्या तीर्थयात्रेपासून (निलय नाग पर्व), काश्मिरच्या गादीवर शाह मीरचे बसणे, ब्राम्हणांकडून काश्मिरी पंडितांपर्यंतचा आणि काश्मीरातील इस्लामीकरणाचा प्रवास लेखकाने सुरेख रेखाटला आहे. भारत - पाकिस्तानच्या स्वातंत्र्य निर्मितीच्या काळातील नाट्यमय घडामोडी, राजा हरीसिंग, तत्कालीन काश्मीर पंतप्रधान काश्मिरी पंडित काक यांची आझाद काश्मिरसाठी चाललेली धडपड, शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू यांची जिगरी यारी, बॅरिस्टर जिनांनी काश्मीर घेण्यासाठी केलेली धडपड, कबिल्यांचा घाटीवरील हल्ला आणि घाईघाईत केलेल्या विलयाचा निर्णय या सर्व घटना 'आझाद काश्मीर' आणि 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' या परस्परविरोधी समस्येची मूळ दर्शवतात.
पुढे इंदिरा राजीव गांधींचे दुर्लक्ष आणि त्यानंतर रुबिया सय्यदचे अपहरण , त्याबदल्यात अतिरेक्यांची सुटका, हृदयनाथ वांचूंची हत्या, पंडितांचे घाटीतून हत्याकांडाच्या भयाने पलायन अशा अनेक घटनांनी नव्वदच्या दुर्भाग्यपूर्ण दशकातील परिस्थिती लेखकाने स्पष्ट रंगवली आहे, तरीदेखील १९९०च्या २० आणि २१ जानेवारीला पूर्ण मुस्लिम समाज काश्मिरी पंडितांच्या वंशनाशावर उठला त्याला लेखकाने "टोन डाऊन" केल्याचे दिसते. पूर्ण समाजच जिथे द्वेषाने पछाडला जातो, तिथे माणुसकी, सदसद्विवेकबुद्धी, धर्मातील दया शिकवण याचा विसर जमावाला नक्कीच पडतो, त्यामुळे काश्मीर ही सामाजिक समस्या जास्त आहे, राजकीय कमीच!
अल फतेह पासून सुरू झालेला काश्मिरी आतंकवादाचा प्रवास जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट,  हुर्रियतला पोचताना ३७० कलम नसते तर काश्मीर सुखाचे नंदनवन असते याची किमान आज ६ वर्षांने प्रकर्षाने जाणवते. अर्थात आपण फक्त पर्यटक म्हणून तिथे जातो, पण तिकडच्या समस्यांचा अंदाज बांधू शकत नाही (ज्या खरं तर आपल्यापेक्षा काही वेगळ्या नाहीयेत, जसे की भ्रष्टाचार, बेरोजगारी,अन्याय आणि अत्याचार इत्यादी इत्यादी, पण ज्याचा बाऊ खूप केलाय काश्मिरी लोकांनी, असे माझे मत आहे).
४४० पानांच्या या पुस्तकात लेखकाने ९० च्या दशकातील दहशतवादी बनण्यासाठी घाटीतून रावळपिंडीत बसभरून मुजाहिदीन जात होते, काश्मीरातील शिक्षणाचे पद्धतशीर झालेले इस्लामीकरण, त्या काळात शाळा कॉलेजात मुले बंदुका, रायफल घेऊन फिरायला लागले होते,  हे वाचून धक्का बसतो. काश्मीर बाबत हैदराबाद, जुनागड प्रमाणे ठोस निर्णय घेण्यात नेहरू जसे चुकले, तसेच त्यानंतरचे सर्वच सरकारे (मोदी सरकार खेरीज) पूर्ण अपयशी ठरले हे पुस्तक वाचून माझे मत झाले. गंमत म्हणजे लेखक मोदी आणि काहीसा भाजप विरोधक आहे, तरीपण राज्यपाल जगमोहन यांच्या काळातील पंडितांच्या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न आणि मनमोहन सरकार काळातील पंडितांच्या पुनर्वसनासाठीच्या पॅकेजची पोलखोल पुस्तकात करतो हे विशेष!!

निश्चितच वाचनीय पुस्तक !!

#२१ न्या लोयांचा खुनी कोण? - लेखक निरंजन टकले

#marathibookreview  #19/2025
"न्या. लोयांचा खुनी कोण?" ही आमचे लाडके पत्रकार लेखक निरंजन टकले (अकबराने कुंभ मेळा चालू केला फेम) यांनी अतिशय सुरेख रचलेली कथा वाचली. शोधपत्रकाराचा प्रवास गुप्तहेर कथेपर्यंत येत येत द वीक मधली नोकरी गेल्यानंतर कारवान नावाच्या नियतकालिकात नोकरी मिळाली नाही या बेरोजगार दुःखावर येऊन थांबते. खरं तर १३६ व्या पानापर्यंत उत्कंठा ताणणाऱ्या या कथेत नंतर काहीही तथ्य नाहीये हे वाचकांना उलगडतेच. पण तरीही पुस्तकाची पाने भरण्यासाठी लेखकाने कथेत रंग भरण्याचा चांगला प्रयत्न केलाय, शेवट सर्वांनीच धनकवडीच्या शेरलॉक टकलेंची साथ सोडली, त्यामुळे माहेरची साडी टाइप डी एंड झाला😐😐.

मुग्धा कर्णिक (मेंदू चेचून घ्यावासा वाटतोय फेम) यांनी या पुस्तकाचा उत्कृष्ट अनुवाद केलाय, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. पण "इंग्रजी नीटसे समजत नाही, पकड घेत नाही म्हणून मराठीतच वाचणाऱ्या वाचकांसाठी..." हे पुस्तक अनुवाद केल्याचे मुग्धा कर्णिक सांगतात 😭😭.  यायला, आय कॅन टॉक अँड वॉक इन फाडफाड इंग्लिश😡😡.
३४४ पानांच्या या पुस्तकात न्या. वी रमण, भारताचे सुप्रीम कोर्ट, भाजप, सावरकर, रा स्व संघ, अण्णा हजारे, केजरीवाल, ट्रोल गँग, न्या मोडक - न्या कुलकर्णी, तेहसीन पूनावाला, एबीपी माझा, प्रसन्न जोशी इत्यादी  सर्वांनी उगाचच मार खाल्लाय 🫩🫩. 

बाकी पुस्तकात वैभव छाया हे शोषण मिडियावर वादग्रस्त लिहिणारे कॅरेक्टर उगाच घुसडले आहे. लेखक मारवाडी आणि ब्राह्मण समाजाला घाबरट म्हणताय, पण पुस्तकात तुमची ही "स्टोरी" कव्हर केल्यानंतर कोण घाबरट आहे, ते वाचकांना समजून जातेच😃.
त्यामुळे माझा आदरणीय टकले सरांना हा प्रेमाचा सल्ला -
तुम्ही अत्यंत चांगले पटकथाकार होऊ शकता... सोडा हे झोळीघाले धंदे आता, सोडा ती "दरोडेखोर" मुंबईतली भाड्याची सिंगल रूम!... न्या झोया वर्ग्रे नावाने अशीच एक कहाणी लिहा, जोहर किंव्हा कश्यपला विका, पैशे छापा ...माझ्यासारखेच हस्तिदंताच्या मनोऱ्यातून चिकन लॉलीपॉप खात हजारे - जरांगे पाटलांच्या उपोषणास पाठिंबा द्या.😎 प्रेम गांधीजींवर करा.. उद्या ते म्हणाले औरंगजेबाचा फोटो नोटेवर, तर आपण टोपी फिरवायची. शेवटी ज्याच्या हाती लाठी, त्याची धरावी काठी😝😝
मुग्धा धनंजय कर्णिक ताईंनी देखील आवटे सरांचा सल्ला ऐकावा... आडनाव लपवले, साबुदाणा खिचडीत अंडे घालून खाल्ले तरी पुरोगामी आणि नास्तिक समाजात तुमची कायम शर्वरी दीक्षित होणार🙁.

#२० कर्दनकाळ - लेखक गुरुनाथ नाईक

#marathibookreview #20/2025

गेली सलग तीन पुस्तके यथातथाच निघाल्याने सुप्रसिद्ध  लेखक गुरुनाथ नाईक यांची "कर्दनकाळ" ही २१५ पानांची कादंबरी वाचायला घेतली. नाईकांनी मराठीत बाराशेहून अधिक रहस्यकथा आणि थरारक कथा लिहल्या आहेत😄.

कथेची सुरुवात मेजर भोसलेंच्या मिसरूड न फुटलेल्या मुलाला चुकून फोनच्या क्रॉस कनेक्शनमध्ये आयएसआय भारतात घातपात घडवून आणण्यासाठी दोन कमांडो पाठवते याचा सुगावा लागतो. आणि मग सुरू होतो अजय, इन्स्पेक्टर धुमाळ, मेजर अविनाश भोसले, फितूर झालेली पाकिस्तानी कमांडो फरीदा यांचा कॅप्टन बुलेट, पाशासाब आणि फायनली बेमालूम वेष बदलणारा बॉस यांचा थरारक पाठलाग !!
या कादंबरीत नाईक यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे रहस्यमय वातावरण, अनपेक्षित वळणे आणि फास्ट स्पीड कथानक यांचा सुंदर मेळ साधला आहे. तालमीतील बलभीम, गोपाळ, बाळू आपटे या पात्रांचा वापर देखील वाचकांना खिळवून ठेवते! चर्च मधील फादर, कुवेत वरून आयएसआयने पाठवलेल्या नूर आणि निकी यांचा वावर कथानकावर विशेष पकड मिळवतो !!

कधीही कंटाळा आला, तरी गुरुनाथ नाईकांची कुठलीही कादंबरी वाचावी, इतके सहज आणि सुरेख लेखन आहे या लेखकाचे. मजा आली !!

#१९ काळी जादू - लेखक उर्मिला भावे

#marathibookreview #21/2025

🧐😐☠️👹💀💀😳😳☠️🫩🫩🫨🫨
कोणी विश्वास ठेवा वा नका ... पण नव्वदच्या दशकात MIT कॉलेज/ रामबाग कॉलनी /वेताळ टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या पोरांना नक्कीच माहिती आहे की अमावास्येच्या मध्यरात्री आत्मे वेताळ मंदिराजवळ हसत - रडत - विव्हळत पार्ट्या करतात, LIC कॉलनीच्या विहिरीजवळच्या बिल्डिंगवरून आत्महत्या केली ती उलट्या पायाची हडळ हिवाळ्यात आंब्याची परडी घेऊन फिरताना देखील बऱ्याच लोकांनी पाहिले आहे. हेच काय आमच्या अपार्टमेंटमधल्या पोरांनी एका नागा साधूची चेष्टा केली आणि त्यामुळे चिडून त्याने भानामती केली होती, ज्यात पोरांच्या डोक्यात वाळूचे खडे सापडायला लागले होते, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे!!

त्यामुळे "काळी जादू" हे २०० पानांचा भयकथा संग्रह (ज्यातील घटना लेखिका उर्मिला भावे सत्य असल्याचे सांगतात) वाचून चुकीचे वाटले नाही. या पुस्तकातील १२ भयकथा काळी जादू, स्वप्नसंदेश, जन्मकुंडली, बळी, अदृष्ट, तळतळाट देऊन गेलेली सून, शाप, भटकणारे असंतुष्ट आत्मे अशा अनेक विषयांवरच्या (ज्याला आधुनिक काळात अंधश्रद्धा म्हणतात) कथित सत्यघटना लेखिकेने सुरेख रंगवल्या आहेत. मात्र 'राहून गेले काही ' ही कथा मी लव्ह स्टोरी सारखी वाचली, शायद मैंने उस नजर से पढा नसेल🫤🤔
तुम्ही दाभोळकर किंव्हा आसाराम बापू यातील कोणाचेही भक्त असला तरी हे पुस्तक वाचायला आवडेल तुम्हाला.
शेवटी मानो या ना मानो 😃

#१८ माणूस असा का वागतो - लेखक अंजली चिपलकट्टी

#marathibookreview #22/2025

"माणूस 'असा' का वागतो" हे अंजली चिपलकट्टी यांनी मानवी वर्तनावर लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक वाचले. सुमारे ४०२ पानांच्या या पुस्तकात मानसशास्त्र, समाजशास्त्र (विशेषतः समूहात राहताना असलेले वर्तन), निर्णयशास्त्र, राजकारण, जाहिरातबाजी अशा अनेक विषयातील उदाहरणे वाचून आपल्या मनाचे आपल्यालाच आश्चर्य वाटण्याशिवाय राहणार नाही.
'आपण' आणि 'ते' फॉल्ट लाइन हे प्रकरण मला विशेष आवडले. विदेशात उंदीर, मासे, वटवाघूळे यांच्यावर केलेले प्रयोग जे लेखिकेने दाखल्यासाठी दिले आहे, ते विस्मयकारक आहेत. धर्म, भाषा, लिंग यांमध्ये मानवाने जी उच्च दर्जाची उत्क्रांती केली आहे ती वाचून शरम वाटायला पाहिजे की अप्रूप वाटायला पाहिजे असा प्रश्न पुस्तक वाचल्यावर पडला मला 😀.

पुस्तकात मात्र काही ठिकाणी लेखिकेने मेंदूच्या विचार करण्याच्या सवयी सांगताना लेखिकेने मोदी सरकारची नाव न घेता स्वतःची मते मांडली आहेत, ती खरं त्यांचाच ' कन्फर्मेशन बायस ' असल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटते. मी लेखक असतो, तर कदाचित टाळले असते, कारण त्यात काही ठिकाणी विषयांतर देखील झाल्याचे वाटले. राजहंस प्रकाशनाचे पुस्तक असून देखील हे पहिलेच पुस्तक लिहिलेल्या लेखिकेला अनेक प्रकरणातील मुद्द्यांच्या क्रमाने मांडणीसाठी मार्गदर्शनाची गरज होती, असे वाचक म्हणून वाटले.

बाकी अशा प्रकारचे मराठीत पुस्तक कदाचित पाहिलेच असावे, त्यामुळे या मराठी नवलेखिकेचे विशेष कौतुक.👏👏👏

#१७ मी बहुरूपी - लेखक अशोक सराफ

#marathibookreview

" विनोदी अभिनय हा गंभीर विषय आहे, मी स्वतः कधी माझे विनोदी चित्रपट पाहताना हसलो नाही"
~महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ

"बहुरूपी" हे अशोक सराफांनी त्यांच्या व्यावसायिक अभिनेत्याच्या प्रवासाचे वर्णन केलेले सुरेख पुस्तक वाचले. प्रत्येक मराठी-अमराठी, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू या सगळ्यांनीच हे प्रेरणादायी पुस्तक वाचावे असेच आहे.
२०८ पानांच्या या पुस्तकात आपले नवकोट नारायण अशोक सराफ यांनी त्यांची पाच दशकाहून अधिक नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका यांतील घोडदौड सुरेख उलगडवून दाखवली आहे. संगीत ययाती - देवयानी मधील विदूषकाच्या भूमिकेपासून सुरवात झाल्यावर सं मानापमान, सं संशयकल्लोळ अशा सर्व संगीत नाटकात त्यांनी स्टेजवर करामत केलीये त्याच्या आठवणी या पुस्तकात आहेत.
स्टेट बँकेतील त्यांच्या दहा वर्षातील नोकरीत त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी कृपा दाखवल्यामुळे आज आपल्याला पद्मश्री अशोक सराफ मिळाले असे म्हणता येईल. वक्खा-विक्खी-विक्खु, धनंजय माने, पांडू हवालदार, निळू फुले, लक्षा, सचिन, दादा कोंडके, सुधीर जोशी, अशी ही बनवाबनवी, हम पांच, शाहरुख खान बरोबरचे चित्रपट याच्या स्टोऱ्या वाचताना आपण नकळत हसायला लागतो.
रंजनाबरोबरचा त्यांचा अजरामर प्रवास देखील "थोडक्यातच" तिला मानवंदना देऊन रेखाटला आहे. त्यांच्या नात्याबद्दल फार काही लिहिले नाहीये, पण फॅन्सना अजूनही या खऱ्या आयुष्यात न जमलेल्या जोडीबद्दल हळहळ वाटतेच.
आपल्या मोठ्या कुटुंबाविषयी छान माहिती सांगितल्यावर शेवटी निवेदिता सराफ यांनी त्यांच्या नजरेतून अशोक सराफ यांचा अभिनय प्रवास सांगितला आहे, तो वाचायला छान वाटतो.

वजीर, बिनकामाचा नवरा आणि भस्म या तीन महानोत्तम चित्रपटांविषयी अशोक सराफ काही बोलले नाही याची मात्र रुखरुख लागते 😃

मीना कर्णिक यांनी शब्दांकन केलेल्या या पुस्तकात अशोक सराफांनी तालमीत किंव्हा शूटवर दाखवलेली व्यावसायिक वृत्ती, सतत स्वतःला improve करण्याचा ध्यास आणि आपल्या कामावर त्यांची असलेली निष्ठा ही नक्कीच खूप काही शिकवून जाते.
पद्मश्री अशोक सराफ हा अभिनय क्षेत्रातील डबल पीएचडी होल्डर आहे असे हे पुस्तक वाचल्यावर वाटते!!

#१६ या सम हा- लेखक मे जनरल शशिकांत पित्रे

#marathibookreview

"या सम हा" हे मे जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी लिहिलेले थोरल्या बाजीरावांचे सुंदर पुस्तक वाचले. बाजीराव पेशव्याच्या २० वर्षांच्या अनेक युद्धांमध्ये वापरलेल्या युद्धतत्वांचा सखोल अभ्यास या पुस्तकात मांडला आहे. अठराव्या शतकातील दक्षिणेत निजामाला, वसई - गोव्यात पोर्तुगीज - इंग्रजांना आणि उत्तरेत बादशहाला हैराण करणाऱ्या मराठा सैन्याचा रोचक इतिहास वाचायला खास मजा आली. उद्दिष्टांची निवड, गतीक्षमता, बळाचे विकेंद्रीकरण, युद्धव्यवस्थापन, सुरक्षितता, सरप्राइज एलिमेंट अशा अनेक युद्धशास्त्रांचा बाजीरावाने लिलया वापर केला त्याकाळी. बाजीरावाने मराठ्यांचे स्वराज्य साम्राज्यात निर्माण केलेच, पण मराठ्यांच्यात अजिंक्यत्वाची भावना निर्माण केली हे पुस्तक वाचून नक्कीच समजेल. लेखकाने बाजीरावांच्या उणिवांवर देखील बोट ठेवले आहे, जसे की सैन्य सुधारणेवर फारसे कधी लक्षच दिले नाही. शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी आरमार बांधले होते, ज्याचा उपयोग बाजीरावाने खणखणीत विजय मिळवायला करायला हवा होता खरं तर. शिवाजी महाराज सेनापती बाजीरावाच्या साथीत अजून वीस वर्षे छत्रपती राहिले असते, तर कदाचित इतिहास खूप वेगळा असता, असे मला वाटते. बाजीरावाने शिवाजी महाराजांच्या वेढा टाकण्याच्या गनिमी काव्याचा सुरेख वापर केल्याचे पालखेड आणि भोपाळच्या युद्धावर्णनात वाचायला मिळाले.

पुस्तकात काही मजेशीर माहित्या देखील सापडल्या. उदा - मुंबई ही पोर्तुगीजांनी ब्रिटनच्या किंग चार्ल्सला पोर्तुगीज राजकन्या कॅथरीनबरोबरच्या लग्नात हुंडा म्हणून भेट दिली होते 😸😸... ठाण्यात कारखान्यासाठी जागा निवडीच्या मागणीसाठी मराठ्यांतर्फे व्यंकट जोशींना बाजीरावाने पोर्तुगीज लष्करी अधिकारी कॅप्टन लुई बोटेल्होला भेटायला पाठवले होते, तर त्याने बाजीरावांना "तो निग्रो आहे" असे संबोधले होते! नंतर मार्च १७३७ मध्ये बाजीरावाने त्याला कुत्र्यासारखा ठाण्यातून पळवला😸💪.

३३४ पानांच्या या पुस्तकात लेखकाने २१ संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला आहे. जबरी पुस्तक आहे, नक्कीच वाचनीय!!

#१५ इस्रायली किमयागार - लेखक आवि योरीश

#marathibookreview 
जरी इस्रायली लोकं ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा बदला युद्धात चक्रम झालेले वाटत असले, तरी "इस्रायली किमयागार" (मूळ Thou Shalt Innovate चा मराठी अनुवाद) हे पुस्तक अनोख्या नजरेतून इस्राईलकडे वाचकांना बघायला भाग पाडेल असेच वाचनीय आहे!
मध्यपूर्वेच्या रक्तरंजित घटनांचे इस्रायली बाजू मांडणारे प्रसिद्ध लेखक आवि योरीश त्यांच्या या २०० पानांच्या अनोख्या पुस्तकात मानवी जीवन सुखकर करण्यासाठी या देशातील कल्पक शास्त्रज्ञांनी लावलेले शोध मांडले आहेत.
आयर्न डोम, उबर अँब्युलन्स, मेंदूसाठी GPS, पोटातले विकार शोधण्याचा कॅप्सूल कॅमेरा, युद्धात जखमी सैनिकांसाठीचे बँडेज, धान्यांची पोती, ठिबक सिंचन अशा अनेक नवसंकल्पना  जगाला भेट देणाऱ्या इस्राएलसारख्या छोट्या देशाची कामगिरी पाहून थक्क व्हायला होते.
माझ्या मते, आपल्या भारतात देखील हजारो जुगाड प्रॉडक्ट्स बाजारात येत असतात, पण त्यांना आपले उद्योजक स्केल अप करू शकत नाहीत किंव्हा त्याचं यशस्वी मार्केट तयार करू शकत नाही... कदाचित हाच आपल्यात आणि त्यांच्यात फरक असावा. शेवटी गरज ही शोधाची जननी आहे हेच खरे!
लेखिका मुक्ता चैतन्य यांनी या नवीन पुस्तकाचा अनुवादाचे काम चोख पार पाडले आहे!!

#१४ पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस - लेखक एडी जाकू

#marathibookreview

काही लेखक खरंच कमाल असतात, ते वाचकांच्या मनाचा आपल्या ओघवत्या शैलीने सहज ताबा घेतात. "पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस" हे त्याच कॅटेगरी मधले पुस्तक आहे. लेखक एडी जाकू हा स्वतःला नेहमीच प्रथम जर्मन आणि नंतर ज्यू समजत असे...नोव्हेंबर १९३८ पर्यंत, जेंव्हा त्याची रवानगी आऊश्वित्झ छळछावणीत नाझ्यांनी केली .. तोपर्यंतच!!

पुढच्या ७ वर्षांत त्याने मित्र, कुटुंब, संपत्ती, स्वतःचा देश सर्व काही गमावले... पण या रोजच्या मृत्युशय्येतून बाहेर पडल्यावर मात्र त्याने रोजचा दिवस आनंदात व्यतीत करायचा ही शपथ घेतली. १६५ पानांच्या या पुस्तकातील प्रत्येक पानावर एडी जाकू "आशा सोडू नका" म्हणजे नक्की काय याचा मंत्रच देतो. प्रत्येक पानावर जगात चांगली माणसे आहेत याची शाश्वती देतो. 
"काळोखातही आनंद शोधता आणि मिळवता येतो" हा एडी यांचा या पुस्तकातील थरारक वर्णनानंतर दिलेला संदेश हा आपल्याला नक्कीच जवळचा वाटेल या अनुवादक शरद वझे यांच्या मताशी मी सहमत आहे.कोव्हिड काळात एडी जाकू यांना १०० वर्षे पुरी झाल्यावर हे पुस्तक प्रकाशित झाले, जे गेल्या वर्षी अनुवादित झाले...
हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे असेच आहे.

#१३ ऍक्ट ऑफ लाइफ बाय अमरीश पुरी

#marathibookreview

''अमरीश पुरी' या खलनायकाचे अतिशय सुंदर आत्मचरित्र वाचले आणि ९० च्या दशकातील मोगॅम्बो, ठाकूर, ऍडव्होकेट चढ्ढा, बलराज चौहान असे अनेक अमरीश पुरी डोळ्यासमोर उलगडत गेले. तब्बल चारशेहून जास्त हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, बंगाली चित्रपटातून खलनायकाची ताबडतोड भूमिका वठवणारे अमरीश पुरी त्यातील यशस्वी चित्रपट आणि सिनेस्टार्स च्या उत्तुंग यशामागचे गमक आहेत हे नक्की!!
३७५ पानांचे "दि ऍक्ट ऑफ लाइफ" हे पुस्तक श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकरांनी उपमा दिलेल्या "नाटककारांचा राजा" अमरीश पुरींनी दोन भागात मांडले आहे. पहिला अंक अर्थात त्यांनी केलेली त्यांचे गुरु पंडित सत्यदेव दुबे यांचे सोबत केलेली हिंदी, बंगाली नाटके, तेंडुलकर लिखित मराठी नाटके यावर फोकस्ड आहे. सखाराम बाईंडर सारख्या त्याकाळच्या वादग्रस्त नाटकात अमरीश पुरींनी निळू फुलेंचा रोल कसा केला असेल याची उत्सुकता वाटते. आपला लहानपणापासूनचा जीवनप्रवास लिहिताना अमरीश पुरींनी त्यांच्या "बाऊजींचे" जे वर्णन केले आहे, तेच दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे, गर्दीश, घातक या चित्रपटातील त्यांच्या वडिलांच्या ताकदवान रोल्सचे दृश्यकल्पना असल्याचे ते सांगतात.
दुसऱ्या अंकात स्वप्नवत आणि अजरामर चित्रपट दुनियेतील सर्वश्रेष्ठ खलनायक बनलेल्या अमरीश पुरींनी अशोक कुमार, किशोर कुमार, अमिताभ, दिलीप कुमार, सनी देओल, संजय दत्त, करीना, कपूर फॅमिली, अनिल कपूर, राजकुमार, माधुरी, काजोल, अक्षय खन्ना, अजय देवगण, करण जोहर अशा बॉलीवूड कलाकारांसोबतचे व्यावसायिक संबंध आणि सवयी रेखाटल्या आहेत. ८० आणि ९० च्या दशकातील सुपरहिट फिल्म्सचे पडद्यामागचे एक सो एक किस्से रंगवले आहेत. अमरीश पुरींची व्यवसायावरची आत्यंतिक निष्ठा, सर्वोच्च कामगिरी करण्याचा ध्यास, आयुष्याकडे बघण्याची वृत्ती खूप काही शिकवून जाते.
"इंडियाना जोन्स" या भारतात बंदी पडलेल्या चित्रपटाविषयी हा हॉलिवूडमधला आपला पहिला भारतीय भरभरून बोलला, आणि या पुस्तकात. स्टीवन स्पीलबर्ग आणि हॉलिवूडमधील चित्रपट बनवण्याच्या व्यावसायिक पद्धती, भारतातील चित्रपट उद्योग व्यवसायाशी तुलना यावर देखील पुरींनी प्रकाश टाकला आहे.

मला व्यक्तिशः हे आत्मचरित्र अतिशय जास्त आवडले. दुर्दैवाने हे आत्मचरित्र लिहून झाल्यावर काही दिवसातच अमरीश पुरींचे आजाराने निधन झाले, त्यामुळे हे शेवटचे सक्सेस त्यांना बघता आले नाही, याची खंत वाटते. पुस्तकाच्या सहलेखिका ज्योती सभरवाल यांनी पुरींच्या व्यग्र चित्रपट वेळापत्रकातून हे पुस्तक संपादित केले तसेच चंद्रकांत भोंजाळ यांनी ते अनुवादित केले, त्यांचे विशेष आभार!

सर्वांनीच आवर्जून वाचावे असे हे पुस्तक!

Sunday, November 2, 2025

#१२ हरवलेले पुणे - लेखक डॉ अविनाश सोवनी

#marathibookreview

आपल्याला पुण्यातलं सगळं माहितेय, असे म्हणत जन्मापासून मी पुण्यात कॉलर उडवत फिरत होतो, त्या तोऱ्याला " हरवलेले पुणे" या डॉ अविनाश सोवनी यांच्या पुस्तकाने ३४१ पानात गारद केला🥹🙄😐.
त्रिखंडात गाजलेले पुणे, जरी थोरल्या बाजीरावाने पुण्याचे स्थान निर्माण केले, नानासाहेब पेशव्यांनी आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशव्याने पुणे खऱ्या अर्थाने भरभराटीस नेले... आणि मग इंग्रजांनी त्यांच्यापरीने पुण्याचे सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न केला, तरी पण पुण्याच्या जन्मखुणा अश्मयुगापर्यंत जातात. कोरेगाव पार्कात अश्मयुगीन हत्यारे सापडली हे माहित असेलच😎💪. पुण्याचे जीवनपर्वच या पुस्तकात रेखाटले आहे म्हणता येईल.  
माझा एक झांबरे नावाचा कीडमिड्या शरीरयष्टीचा, पाप्याचं पित्तर टाईप आणि कायम पोरांमध्ये बिचकुन राहणारा दोस्त होता लहानपणी. झांबरे पाटील हे पुण्याचे पहिले पाटील/ सरपंच/ चीफ/ पुणेवाडीचा राजा (जे काय म्हणाल ते) होते हे पुस्तकात वाचल्यावर आम्ही केलेल्या त्याच्या अवहेलेनेची आठवण झाली आणि शरम वाटली स्वतःची.
औरंगजेबाने पुण्याचे नाव मुहियाबाद केले होते आणि ते अधिकृत आजतागायत कोणी बदलले नाही, पण लोकांनी ते स्वीकारले नाही नशीब त्याकाळी... नाहीतर माझ्या फेसबुक मित्रांनी बाजार उठवला असता माझा याविषयावरून🥹.
लकडी पुलाची दर्दभरी कहाणी, सर्व वारांच्या पेठा कशा पेशव्यांनी जन्माला घातल्या, पेशव्यांचे त्याकाळचे फार्म हाऊस म्हणजे कोथरूड, नाना फडणीस नळयोजना आणि पुष्करणी हौद (आता भेळेची गाडी असते तिथे😒), बंडगार्डन, आर्यन सिनेमा (जिथे आता मंडईचे पार्किंग आहे😡), हुजूरपागा (पेशव्यांचा घोडे पार्किंग स्लॉट), पुण्याचे पहिले जेल (आता मामलेदार कचेरी, सेम ट्रीटमेंट😝), खडकमाळ, त्याकाळच्या ब्रिटिश विचारसरणीच्या नवश्रीमंतांचा डेक्कन जिमखाना, फडके हौद (फडके डेअरीशी ज्याचा काही संबंध नाहीये🫤) अशा ५५ ते ६० पुण्यातल्या जागांविषयी रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. टिळक टँक हा शेजारच्या दगडाच्या खाणीने तयार झालेल्या खड्ड्यातून तयार केला गेला हे वाचून धक्का बसला😐.
तब्बल ३८ संदर्भ ग्रंथ/ कुलवृत्तान्त / पेशव्यांच्या, ब्रिटिशांच्या ऐतिहासिक नोंदी आणि चार शतकातील चार तत्कालीन अधिकृत नकाशे यांच्या सखोल अभ्यासाने लिहिलेले हे पुस्तक वाचून वीणा वर्ल्ड पुण्यावर एखादी ग्रुप टूर सहज काढेल इतका खजाना या अस्सल पुणेप्रेमी लेखकाने लिहला आहे😀
बाकी मूळ पुण्यात झांबरे पाटलांबरोबरच ढेरे, निलंगे, कवलंगे, कानडे, शाळीग्राम, वैद्य आणि भराईत अशी आठ घराणे आहेत हे समजले. त्यामुळे किमान आयटी सेलच्या पोरांना जाता येता, तू बाहेरचा आहेस, काफिर आहेस असे हिणवणे हा माझा तरी प्राचीन हक्क आहे हे समजल्याने समाधान वाटते ✌️🙏👏.

११ गौतम अदानी - लेखक आर एन भास्कर

#marathibookreview

गुजरातेतल्या कच्छ प्रांताने भारत भूमीला अनेक बडे उद्योगपती दिले... कारण स्वतःचा व्यवसाय, धंदा करणे हे या लोकांच्या जिन्समध्येच आहे. उद्योगपती गौतम अदानी याच कोरड्या प्रदेशातून आणि कायमच प्रतिकूल परिस्थितीतील प्रदेशातले उत्पन्न😁.
जेष्ठ पत्रकार आर. एन. भास्कर यांनी गौतम अदानींच्या कारकिर्दीचा गेले अनेक वर्ष पाठपुरावा केला आहे. त्यांनी " गौतम अदानी - व्यावसायिक कल्पनांचा कायापालट करणारी असामान्य व्यक्ती" या २२० पानी पुस्तकात या बुद्धिमान व्यावसायिकाच्या दृष्टिकोनाबद्दल, आयुष्याबद्दल आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीचे चित्र रेखाटले आहे. (अनुवाद - पूनम छत्रे).

या पुस्तकात ८० च्या दशकात तरुण अदानींच्या पहिल्या हिरे सौदा व्यापारापासून गेम चेंजर मुंद्रा बंदर, ऑस्ट्रेलियातील कोळसा खाण व्यवसाय, विमानतळ, कृषी, वीज निर्मिती अशा अनेक व्यवसायात दाखवलेली धडाडीची वृत्ती, जोखीम घेण्याची पद्धत, माणसे जपण्याची सवय आणि धंदेवाईक नजर याचा सुरेख आढावा घेतला आहे. बड्या व्यावसायिकांना मोलाची साथ काँग्रेस असो वा भाजप सरकार का देते याचा राष्ट्रहिताशी संलग्न या प्रकरणात लेखकाने अचूक वेध घेतला आहे.  आकाशाएवढी स्वप्ने बघण्याचा आणि प्रत्यक्षात उतरवण्याचा गौतम अदानींच्या ध्यासाचे अप्रूप वाटते. त्यांची स्पीडने निर्णय घेण्याची क्षमता हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असावी असे मला वाटते.

बाकी आपण मराठी लोकं आयुष्यभर अस्मितेचा मुडदा बशिवत बसतो, पण तिकडे हा कच्छी गुजराथी माणूस आणि त्याचा अदानी समूह गेल्या २० वर्षात ४२ पट विक्री, ४२ पट उत्पन्न आणि २५२ पट करपूर्व नफा छापतो. कदाचित मराठी माणसाने जैन, गुजराती आणि विशेषतः कच्छी समाजाकडून काही गोष्टी शिकल्या तर नक्कीच आपण प्रगती करू शकू... पण अहंकारापुढे आपला स्वार्थ क्षुद्र ठरतो हीच अडचण असते 😀.

#१० कब्जाधीश - लेखक नितांत त्रिलोकेकर

#marathibookreview

वीकएंडला "कब्जाधीश" नावाची कोरी करकरीत आणि झंझावती कादंबरी वाचून काढली जी नितांत त्रिलोकेकर या चार्टर्ड अकाउंटंट लेखकाने लिहली आहे. 
रोहित नावाचा प्रथितयश  हॅकर, सुसान ही सायबर क्राइममधली पत्रकार, कर्नल जोन्स, भारतीय सायबर आर्मीचा सदस्य डेस्मंड या सर्व पात्रांना घेऊन कथानक हैदराबाद, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि जिथे न्युक्लिअर बॉम्ब देखील हानी पोचवू शकणार नाही असे मर्क्स कंपनीचे मालवाहू जहाज ज्यात गोपनीय वॉर रूम आहे या ठिकाणी फिरते.
चायनिज सायबर आर्मीच्या खूनखार जनरल पिंगचे ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतावर देखील हल्ले करण्याच्या योजनेवर Row Heat कसा मात करतो हे वाचताना मजा येते. सतत घटना घडत असतात आणि वाचकांना १९६ पानात लेखक खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
रोहितची आपल्या ex GF शीलाला सोडून पुस्तक शेवटच्या वाक्यात सुसानबरोबर प्रेमात आसक्त बुडाला आहे येथे संपते... पण शीलाला रोहित विसरला ? का कदाचित कब्जाधीश कादंबरीच्या पुढच्या भागात शीलाला एन्ट्री देण्यासाठी लेखकाने जागा ठेवली आहे... समजेलच😁.
मुकुंद इंगळे यांनी उत्कृष्ट अनुवाद केला आहे या इंग्रजी पुस्तकात अत्यंत कमी वेळात, त्यांचे विशेष कौतुक.
गेले चार पाच वर्षात खूप चांगले साहित्य भारतात निर्माण होत आहे, याचा पुरावा हे पुस्तक देखील आहे.