#marathibookreview #14/2025
"झुळूक अमेरिकन तोऱ्याची" हे धमाल पुस्तक वाचले. जवळपास १२ वर्षे झाली असतील मी शेवटचे अमेरिकेला जाऊन. पण माझ्या आठ दहा अमेरिका वाऱ्यांमध्ये माझी जी काही त्रेधा तिरपीट झाली ती या १९५ पानी पुस्तकात लेखक शरद वर्दे यांनी तंतोतंत रेखाटली आहे म्हणेन. खरंच अमेरिका हे अदभुत रसायन आहे. इथे आलेला प्रत्येक माणूस स्वत्व विसरून अल्पावधीतच अमेरिकन बनतो. त्याची भाषा बदलते, पेहराव बदलतो, दृष्टिकोन आणि सवयी बदलतात.
ग्रीनकार्डहोल्डर (ज्याला लेखक श्री व सौ हरितपत्रिका धारक म्हणतो), व्हॉईसमेल, अमेरिकन इंग्रजी आणि त्याचे उच्चार, इलेक्ट्रॉनिक स्वयंचलित उपकरणे (विशेषतः कोळंबी सोलायचे यंत्र😝), अचानक उगवणारे अतिथी देवो न भव आणि अशा अनेक भारतीय अमेरिकी जीवनाचे अंतरंग लेखक उलगडवतो त्याला तोड नाही.
प्रत्येक वर्णनात खळखळून हसवणारा लेखक १८० व्या पानावर मात्र अमेरिकेत हरितपत्रिका मिळालेला मुलगा आणि सून यांचे 'इंडियन गार्बेज' झालेल्या आणि इकडे भारतात एकटे पडलेल्या वृद्ध आईवडिलांसाठी पंचतारांकित वृद्धाश्रमाची व्यवसाय कल्पना करतो ते वाचून हळहळ वाटते. आश्चर्य वाटेल, पण २०१२ साली लिहिलेल्या या पुस्तकातील हे शब्द यंदा १३ वर्षांनी पुण्यात परांजपे बिल्डरने रु ६५००० प्रति महिना भाड्याने काढलेल्या 'अथश्री' मॅनेज ओल्ड होम्स स्कीममध्ये खरे करून दाखवलेच की!!
अर्थात भारतीय अमेरिकी लोकांच्या जीवनातील अनेक पैलूंचा सकारात्मक विचार हे पुस्तक करायला नक्की लावेल.

No comments:
Post a Comment