#marathibookreview #18/2025
काश्मीर इतिहासाचे आणि समकालीन घटनांचे तज्ञ, शोधपत्रकार अशोक कुमार पांडेय यांनी ३७० कलम हटवल्यानंतर लगेचच लिहलेले "काश्मीर आणि काश्मिरी पंडित" हे जबरदस्त पुस्तक वाचले.
काश्मीर मधील इतिहास - वर्तमान - भविष्य हे भयावह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अंतरद्वंद्वाने भरलेले आहे हे पुस्तक वाचून नक्कीच वाटेल. काश्मिरच्या जन्मापासून म्हणजेच कश्यप ऋषींच्या तीर्थयात्रेपासून (निलय नाग पर्व), काश्मिरच्या गादीवर शाह मीरचे बसणे, ब्राम्हणांकडून काश्मिरी पंडितांपर्यंतचा आणि काश्मीरातील इस्लामीकरणाचा प्रवास लेखकाने सुरेख रेखाटला आहे. भारत - पाकिस्तानच्या स्वातंत्र्य निर्मितीच्या काळातील नाट्यमय घडामोडी, राजा हरीसिंग, तत्कालीन काश्मीर पंतप्रधान काश्मिरी पंडित काक यांची आझाद काश्मिरसाठी चाललेली धडपड, शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू यांची जिगरी यारी, बॅरिस्टर जिनांनी काश्मीर घेण्यासाठी केलेली धडपड, कबिल्यांचा घाटीवरील हल्ला आणि घाईघाईत केलेल्या विलयाचा निर्णय या सर्व घटना 'आझाद काश्मीर' आणि 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' या परस्परविरोधी समस्येची मूळ दर्शवतात.
पुढे इंदिरा राजीव गांधींचे दुर्लक्ष आणि त्यानंतर रुबिया सय्यदचे अपहरण , त्याबदल्यात अतिरेक्यांची सुटका, हृदयनाथ वांचूंची हत्या, पंडितांचे घाटीतून हत्याकांडाच्या भयाने पलायन अशा अनेक घटनांनी नव्वदच्या दुर्भाग्यपूर्ण दशकातील परिस्थिती लेखकाने स्पष्ट रंगवली आहे, तरीदेखील १९९०च्या २० आणि २१ जानेवारीला पूर्ण मुस्लिम समाज काश्मिरी पंडितांच्या वंशनाशावर उठला त्याला लेखकाने "टोन डाऊन" केल्याचे दिसते. पूर्ण समाजच जिथे द्वेषाने पछाडला जातो, तिथे माणुसकी, सदसद्विवेकबुद्धी, धर्मातील दया शिकवण याचा विसर जमावाला नक्कीच पडतो, त्यामुळे काश्मीर ही सामाजिक समस्या जास्त आहे, राजकीय कमीच!
अल फतेह पासून सुरू झालेला काश्मिरी आतंकवादाचा प्रवास जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, हुर्रियतला पोचताना ३७० कलम नसते तर काश्मीर सुखाचे नंदनवन असते याची किमान आज ६ वर्षांने प्रकर्षाने जाणवते. अर्थात आपण फक्त पर्यटक म्हणून तिथे जातो, पण तिकडच्या समस्यांचा अंदाज बांधू शकत नाही (ज्या खरं तर आपल्यापेक्षा काही वेगळ्या नाहीयेत, जसे की भ्रष्टाचार, बेरोजगारी,अन्याय आणि अत्याचार इत्यादी इत्यादी, पण ज्याचा बाऊ खूप केलाय काश्मिरी लोकांनी, असे माझे मत आहे).
४४० पानांच्या या पुस्तकात लेखकाने ९० च्या दशकातील दहशतवादी बनण्यासाठी घाटीतून रावळपिंडीत बसभरून मुजाहिदीन जात होते, काश्मीरातील शिक्षणाचे पद्धतशीर झालेले इस्लामीकरण, त्या काळात शाळा कॉलेजात मुले बंदुका, रायफल घेऊन फिरायला लागले होते, हे वाचून धक्का बसतो. काश्मीर बाबत हैदराबाद, जुनागड प्रमाणे ठोस निर्णय घेण्यात नेहरू जसे चुकले, तसेच त्यानंतरचे सर्वच सरकारे (मोदी सरकार खेरीज) पूर्ण अपयशी ठरले हे पुस्तक वाचून माझे मत झाले. गंमत म्हणजे लेखक मोदी आणि काहीसा भाजप विरोधक आहे, तरीपण राज्यपाल जगमोहन यांच्या काळातील पंडितांच्या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न आणि मनमोहन सरकार काळातील पंडितांच्या पुनर्वसनासाठीच्या पॅकेजची पोलखोल पुस्तकात करतो हे विशेष!!

No comments:
Post a Comment