Sunday, November 2, 2025

#२ ब्लडलाइन - लेखक सिडने शेल्डन

#marathibookreview

सिडने शेल्डन या जगप्रसिद्ध अमेरिकी लेखकाने उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहल्या, त्यातलीच एक "ब्लडलाईन" ही ८० च्या शतकात तुफान गाजलेली कादंबरी वाचली. हा महान लेखक आपल्या जादुई लेखणीने  वाचकांना कायमच कथानकात खिळवून ठेवतो, ही कादंबरी देखील त्याला अपवाद नाही.

एका अतिशय प्रचंड आणि जगप्रसिद्ध फार्मा उद्योगाची मालकी सॅम रॉफ यांच्या अपघाती निधनानंतर (का हत्येनंतर?😀) मिस एलिझाबेथ रॉफ हिच्याकडे आल्यावर तिच्याच आप्तांपैकी कोणीतरी संपत्तीच्या इर्षेने जीवावर उठते आणि एक रोमहर्षक कहाणी सुरू होते.
वंशपरंपरागत चालत आलेल्या "रॉफ अँड सन्स" ला लिस्टेड कंपनी करण्याला कसून विरोध सॅम रॉफचा योग्यच होता ते शेवटच्या ३८२ व्या पानावर वाचकांना मनोमन पटते.

२०० व्या पानानंतर मूळचा अकाउंटंट असलेला आणि नंतर ख्यातनाम डिटेक्टिव झालेला मॅक्स हॉर्नंगची व्यक्तिरेखा मला मनापासून आवडली. फोटोग्राफिक मेमरी, शक्य तेथे बसने प्रवास, जमेल तिथे पैसे वाचवण्याची वृत्ती अशी अकाऊंटंट लोकांची टिपिकल जीवनशैली मी माझ्या अनेक सहकाऱ्यात जवळून बघितली आहे, त्यामुळे मॅक्सलाच नकळत मी कथानकाचा हिरो बनवला😁🤩.

सिडने शेल्डनने रिज विल्यम्स, सर ॲलेक, वाल्थर आणि बिचारी ऍना, हेलन, विव्हियन, सिमोनेट्टा आणि डोनातेल्ला ही पात्रे जबरदस्त रंगवली आहे. रहस्यकथेच्या शेवटपर्यंत तुमचा संशय या डझनभर संशयितांवर राहील याची काळजी कादंबरीत घेतली आहे.

यावर्षी आत्तापर्यंत वाचलेल्या ३८ पुस्तकात या पुस्तकाला मी नक्कीच २०२५ बेस्ट रीड यादीत स्थान देईन! विजय देवधर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत या कादंबरीचा सरस अनुवाद केलाय, ज्यामुळे मराठी वाचकांना देखील या कादंबरीचा आनंद घेता येतोय😀🙏.

No comments:

Post a Comment