#bookreview #punemurderchronicals
देवकृपेने पुण्यात जोशी - अभ्यंकर आणि राठी हत्याकांड वगळता कधी फारसा खूनखराबा झाला नाही, पण "पुणे मर्डर क्रॉनिकल्स" या रहस्यमय कादंबरीत फाऊंटन पेनने स्मितहास्य कोरलेल्या सिरीयल हत्याकांडाचा कथेचा हिरो अर्थात शोधपत्रकार चक्रधर थरारक पाठलाग करतो आणि जीवावर बेतून गुन्हेगाराचा मागोवा घेतो. प्रत्येक संशयीताकडे ॲलिबी आहे, खुनासाठी पुरेसा हेतुदेखील आहे, परंतु पोलिसांकडे भक्कम पुरावा नाही, अशा परिस्थितीत हॅकर अतिफ मयातांच्या ऑफिसातील काही धागेदोरे शोधून देतो. बाकी चकचकीत कॉर्पोरेट जगतातील दिव्या आणि नाइंटिज मध्ये अडकलेला चक्रधर यांची होऊ घातलेली प्रेमकथा या पुस्तकात संदर्भहीन असली, तरी कदाचित पुढच्या कथेत लेखिका त्याचा वापर करेल अशी आशा आहे.
मयताचे शव जुन्या पुणे मुंबई हायवे वर सापडणे, चक्रधरचा पाषाण लेक समोरील फ्लॅट तसेच प्रभात रस्त्यावरील वसुधाकुंज बंगला, कोथरूडमधील गौतमी गाडगीळचे घर, इन्स्पेक्टर पटवर्धनने संशयित मारेकरी नाईकचा पाटील इस्टेट, वाकडेवाडी येथे घेतलेला शोध, तर इनव्हेस्टमेंट बँकर कुमारला औंधमधून खूनापूर्वी पबमधून उचलणे इत्यादी सर्व कथानक पुण्यात फिरते, त्यामुळे आपल्याला ते जास्त नजरेसमोर येते...स्टोरीत जबरदस्त स्पीड आहे. मध्यंतरानंतरचे ट्विस्ट अफलातून बसलेत. लेखिका मानसी सप्रे यांनी सर्वच पात्रांचे स्वभाव आणि सवयी, गुन्ह्याची ठिकाणे आणि कथानक जिथे जिथे फिरते त्या ठिकाणची परिस्थिती याचे नेमके आणि अचूक वर्णन केल्याने पुस्तक पूर्ण ३०४ पाने वाचकांना खिळवून ठेवते!

No comments:
Post a Comment