Sunday, November 2, 2025

#९ मी पाहिलेला जपान - लेखक मुकुंद लेले

#marathibookreview

"नेचर इज ओव्हररेटेड" हे वाक्य मी पुढच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं या विषयावर चर्चा चालू असताना फेकले आणि हिरोशिमात बॉम्ब खाल्लेल्या जपान्याची अवस्था करून घेतली.  खरं तर मी प्रवासवर्णने वाचत नाही, की माझ्या ४ किलोमीटर रेडियस बाहेर उगाच फिरण्यात मला आनंद सापडतो. पण जपान बघून आलेला माणूस मात्र कायम जपानचं घसा फाडेपर्यंत कौतुक करतो. वर जपानी रस्ते, शिस्त, स्वच्छता यांची तुलना पुण्याबरोबर करून आपण थर्ड वर्ल्ड देशाचे सेकंड क्लास नागरिक असल्याचे फिलिंग देतो🫤😒🙄.
म्हणूनच कुतूहलापोटी "मी पाहिलेला जपान" हे मुकुंद लेले लिखित २९८ पानी पुस्तक वाचले. होकायाडो (उत्तर जपान) आणि होन्शू (दक्षिण जपान) येथील पर्यटन स्थळांचे भरभरून वर्णन करणारे हे पुस्तक. सहसा पर्यटनामध्ये लोकं (मी आणि माझी कन्या सोडून) वाटेल त्या गोष्टींचे हजारो फोटो काढत फिरत असतात, पण या लेखकाला नोट्स काढायची भारी सवय, त्यामुळेच साईट शिंग करून आला की लेखक लिहून काढत होता ज्यातून हे पुस्तक तयार झाले. जपानमधील वेळेची शिस्त, टापटीपपणा, कल्पनातीत सार्वजनिक स्वच्छता, दुसऱ्यांप्रती कर्तव्यभावना, नेमकेपणा, दयाळूपणा, समाजाविषयी आपुलकी, सचोटी, निष्ठा, अचूकपणा या जपानी जीवनशैलीला / आचारसरणी तत्वाला "वा (WA)" असे म्हणतात, हे पुस्तकात वाचायला मिळाले. पण प्रत्येक पर्यटन स्थळावर लेखकाला हाच अनुभव आल्याचे समजते.

आपण कसे मराठी भाषा येत नाही, म्हणून अमराठी माणसाला धोपटून काढतो... जपानी लोकं सुद्धा भाषिक अस्मितावाले...पण तरीही त्याचा गैरफायदा घेऊन परदेशी प्रवाशांना फसवणे, लुबाडणे, चुकीचे मार्गदर्शन करणे या घटना लेखकाला जपानमध्ये आढळल्या नाहीत की तिकडच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या नाहीत 🥹🥹🥹.
माउंट ऊसु, लेक तोया, रेल्वे म्युझियम, शिंटो शिरीन (तीर्थस्थळ) ही पर्यटन स्थळे आणि त्यांची सामुराई व्यवस्था मला वाचताना विशेष आवडली.
असो, एकदा का मी निर्मला अक्कांनी लादलेल्या इन्कम टॅक्स भरण्यासाठीचे काढलेले कर्ज फेडले😡, की मी नक्कीच आयुष्यात एकदा तरी जपान बघून येईन म्हणतोय😇🙌🏻.

No comments:

Post a Comment