#marathibookreview #11/2025 #पोलिस फाइल्स २
पोर्शे प्रकरण, कोयता गँग, अमली पदार्थ तस्कर बादशाह ललित पाटील, स्वारगेट बलात्कार किंव्हा मोहोळचा कोथरूडात आणि अंदेकरचा कसब्यात झालेला गेम, या आणि अनेक प्रकरणामुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर सर्वजण तुटून पडलेले असतातच. पण पोलिस हजारो केसेस अत्यल्प साक्षी पुराव्यांच्या बळावर देखील सोडवतात यावर कोणी कधीच बोलत नाही. पोलीस फाईल्स - भाग २ हे लेखिका तृप्ती कुलकर्णी यांनी संपादन केलेले पुणे पोलिसांच्या २५ लक्षवेधी तपासकथांचे छान पुस्तक आहे. भाग एक काही वर्षांपूर्वी वाचल्याचा माझ्या स्मरणात होताच. खरं तर पोलिस स्टेशनात आलेल्या प्रत्येक तक्रारीचा गुन्हा दाखल केला, तर पुढची तारीख सात जन्मानंतर येईल इतके आपल्या देशात भांडणतंटे रोज होत असतात. म्हणूनच प्रत्येक ठाणे अंमलदाराच्या खोलीबाहेर एक बाकडं असते, ज्यावर बसून फिर्यादी आणि आरोपी दोघेही साहेब राऊंडला जाऊन येईपर्यंत आत्मचिंतन करतात आणि ९८% तंटे तिथेच मिटतात😝🙏.
पुणे पोलिसांनी आपल्या प्रसंग चातुर्याने, अनुभवाने, खबरी नेटवर्कद्वारा, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर आणि विलक्षण धैर्य दाखवून या पुस्तकात कथन केलेल्या केसेस सोडवल्या आहेत. ड्यूटीमुळे सगळ्याच सणांना तिलांजली देऊन ऑटोमॅटिक नास्तिक झालेल्या सर्वधर्मीय पोलिसांचे कामाचे आयुष्याची झलक या तपास कथांमधून मिळते. एकही चौकीत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी किमान एक स्वच्छ टॉयलेट देऊ शिकत नाही इतकी किंमत सरकार "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" बॅच घेऊन फिरणाऱ्यांची ठेवते, ही शोकांतिकाच म्हणावी आपल्या महाराष्ट्रात तरी..
२०० पानांच्या या पुस्तकात लेखिकेने अपहरण, नवरा बायकोचे तंटे, ऑनलाइन फसवणूक, मर्डर, भेसळ, तडीपार अशा अनेक तपासकथा अलगद उलगडवून सांगितल्या आहेत.

No comments:
Post a Comment