Thursday, January 15, 2026

#५६ फिल्मफेअर - जानेवारी २०२६

#filmfareJan2026 #3/2026

जवळपास दोनदशकांनंतर फिल्मफेअर हातात घेतले आणि बॉलीवूडशी पुन्हा जुळवायचं मनावर घेतले😃.
डिसेंबर जानेवारीच्या या अंकात कार्तिक आर्यन या नायकाचा फोटो आहे कारण त्याचीच मुलाखत आत फोकस ठेऊन छापली आहे. "सोनू के टीटू की स्विटी" या एकदा विमानात मी कधी काळी पाहिलेल्या छपरी चित्रपटाचा हिरो हा कार्तिक होता हे आज समजले. बाकी इंटरव्ह्यू सुमार दर्जाचा होता, कारण तो फक्त कार्तिकचा अनन्या पांडेबरोबर येऊ घातलेल्या "तू मेरा मै तेरी" चित्रपटाच्या निर्मात्याने स्पॉन्सर केलेला असावा. अनिल कपूरच्या सोफ्यावर जाऊन गप्पा मारू शकतो ही याची achievement.
याखेरीज प्रियांका चोप्रा आणि विशेषतः फरहान अख्तर, तमन्ना भाटिया यांचे इंटरव्ह्यू मला आवडले. सई महेश मांजरेकरने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर फिनलंड आणि स्वीडन फिरून आली, तेथील प्रवासवर्णन केले आहे, छान आहे. फॅशन डिझायनर आश्ले रिबेलो सांगतो की तुम्ही बुटके असाल, तर सेम कलरचे शर्ट पँट घाला (टोन टू टोन स्टाईल)ज्याने तुम्ही उंच आणि स्लिम दिसता.
१०० करोड क्लबमध्ये गेल्यावर्षी १० चित्रपट गेले, त्यातला मी एकही पहिला नाही हे समजल्यावर कधी काळी झाडून सगळे चित्रपट पाहणाऱ्या फॅनला किती अंतर कापावे लागणार आहे, याचा अंदाज आला😃.
धर्मेंद्रच्या फिल्म करिअरचा आढावा चांगला लिहला आहे. OTT स्टार्सना आता फिल्मफेअरमध्ये स्थान मिळते आहे, हे वाचून आनंद वाटला.
मात्र या अंकात सर्वात जास्त आनंद घेतला तो "कपूर अँड सन्स"  खानदानातील  आदित्यराज शम्मी कपूर (जे इंडस्ट्री मध्ये नाहीयेत) यांचा  लेखक फरहाना फारुक यांनी घेतलेला इंटरव्ह्यू, ज्यात कपूर खानदानातील अनेक सुरस कहाण्या समोर आल्यात. गीता बालीचा अकाली मृत्यू ही खरोखरीच इंडस्ट्रीची शोककथा होती. कपूर फॅमिलीचा फोटो पाहून छान वाटले .. पण सैफ अली तेवढा त्यात खटकत राहतो आपल्याला 😃.
मजा आली वाचून.

Wednesday, January 14, 2026

#५४ इराणच्या गुप्त नोंदी - लेखक नदीम सिराज

२/२०२६ #marathibookreview 

"इराणच्या गुप्त नोंदी / Secret Notes from Iran" हे १८० पानांचे पुस्तक नावामुळे उचलले.    खरं तर या पुस्तकात कोणत्याही गुप्त/सीक्रेट माहिती दडवली नाहीये 😃.  हे पुस्तक फार तर इराण सहलीवर गेलेल्या एखाद्या सामान्य भारतीयाने लिहिलेली निरीक्षणे म्हणता येईल.

लेखक नदीम सिराज (अनुवादक प्रसाद साळवी) यांनी ९ प्रकरणात या पुस्तकाची विभागणी केली आहे. तेल आणि पेट्रोडॉलर याचा रंजक प्रवास सांगताना लेखकाने १९७९ च्या इराणी क्रांती पासून खेमेनी पर्यंत इराण अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. बहुचर्चित हिजाब विरोधी चळवळीविषयी एक छान प्रकरण लिहिले आहे. अमेरिकी दूतावासाला अमेरिकेविषयी तिरस्कार होईल अशा कलाकृती ठेवल्याचे वाचून आश्चर्य वाटले.
भारत इराण संबंध, इराणी जनतेचे बॉलिवूड वरील निस्सिम प्रेम आणि चाबहार बंदर यावरील लेखन विशेष भावले.

ना लेखक दडून बसला होता, ना त्याच्या नोंदी काही गुप्त स्वरूपाच्या आहेत. ज्याप्रमाणे लेखक अमेरिकेच्या प्रोपोगेंडा विषयी बोलतो, तसे हे पुस्तक इराणचा प्रोपोगेंडा म्हणू शकतो😃

Thursday, January 8, 2026

#५३ "द स्काय इज फॉलिंग"- लेखक सिडने शेल्डन

#Book 1/2026

क्रॅसनोयारस्क २६ हे रशियातील अण्वस्त्र उत्पादनात गुंतलेल्या एकूण १३ बंदिस्त शहरांपैकी एक शहर आहे. १९५८ मध्ये निर्मिती झालेल्या या शहरात पंचेचाळीस टनांपेक्षा जास्त प्लुटोनियम या शहराने निर्माण केले आहे (जेथे प्लुटोनियम निर्माण करणारी अणुभट्टी अजूनही चालू आहे, ज्यात अणुबॉम्ब बनतात). लेखक सिडने शेल्डन यांनी लिहिलेली "द स्काय इज फॉलिंग" ही काल्पनिक कादंबरी आहे. ३४४ पानांच्या कादंबरीचा अनुवाद माधव कर्वे यांनी सुरेख केला आहे.

तर कथानक डॅना इव्हान्स या टीव्ही वर गुन्हेगारी विषयक बातम्या देणाऱ्या नायिकेभोवती फिरते. उत्कंठावर्धक करण्याच्या नदात लेखकाने पुस्तक खूप जास्त लांब खेचले, त्यामुळे रटाळ होत असताना जवळपास २७५ पानांनंतर शेवटाकडे नेताना लेखकाला खूप धावपळ करावी लागली असे मला वाटले. व्यक्तिशः मला ही काल्पनिक कादंबरी फार तर एखादी टीव्ही सिरीयल होऊ शकेल याच पात्रतेची वाटली.
खरं सांगायचं तर मजा आली नाही तितकीशी !!

बाकी जेफ, रचेल, केमाल, रॉजर आणि पामेला हडसन ही पात्रे छान रंगवली आहेत. हडसनच्या खाजगी जेट चा हवेत स्फोट होताना बोरिस खाली असतो हा ट्विस्ट आवडला :).