#marathibookreview #15/2025
"मिस्टर अँन्ड मिसेस जिना" हे पुस्तक पेहेलगामच्या आधी वाचायला घेतले होते. कैद - ए-आझम बॅरिस्टर जिना आणि त्याच्याहून २४ वर्षाने लहान असलेल्या मिस रट्टी पेटीत या अतिश्रीमंत पारशी व्यापाराच्या कन्येशी झालेल्या आंतरधर्मीय धक्कादायक विवाहाची ही कहाणी सुरू होते ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या, चेहऱ्यावर खत्रुड भाव ठेवणाऱ्या ख्यातनाम वकील मोहम्मद जिना आणि रट्टीच्या प्रेमकहाणीने, सर दिनशॉ पेटिट यांनी कोर्टातून जिनांना आपल्या कन्येशी विवाह करण्यासाठी आणलेला मनाईआदेश, नंतर धर्मांतर, रट्टीचा जिनांबरोबरचा राजकीय प्रवास, नंतर तिचा स्वैर बेफिकीर उच्चभ्रू आयुष्याचा आनंद, जिनांचा गांधीजींवर कुरघोडी करण्याचा सततचे अयशस्वी प्रयत्न इत्यादी... मात्र ही शोकांतिका संपते मिसेस रट्टनबाई जिना यांच्या वेदनादायी मृत्यूने !!
लेखिका शीला रेड्डी यांनी बॅरिस्टर जिना यांचे सचिव छागल , सहकारी कांजी आणि मुख्यतः सरोजिनी नायडू (ज्यांचे जिनांबरोबर घरचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते) यांच्या पत्रांच्या, नोंदींच्या आधारावर हे ३०० पानी पुस्तक लिहिले आहे, जे वाचकांना खिळवून ठेवते.
या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे जिना स्वतःला धार्मिक नेता समजत न्हवते, त्यामुळे रट्टीसोबतच सिगरेटी फुकणे, रात्रभर दारू पिणे किंव्हा हॅम सँडविच खाणे असेल... सौंदर्याची खाण असलेल्या रट्टीला बिना बाह्याचा ब्लाऊज घालून फॅशनेबल वाईफ घेऊन स्वतःला आधुनिक मुसलमान म्हणवता आले. यायला पाकड्यांचा राष्ट्रपिता असा इस्लाम निषिद्ध राहिला आयुष्यभर, एकमेव बायकोला पण छळले नाही, उलट तिच्या स्वच्छंदी वागण्याला पैसे पुरवले आयुष्यभर... आपल्याकडे गांधीजींनी असे काही केले असते तर त्यावेळेलाच बाजार उठवला असता.
अर्थात मिस्टर अँड मिसेस जीनांच्या एकुलत्या एक कन्येने दिना पेटिटने जिनांच्या विरोधात जाऊन पारशी बिजनेसमन निविले वाडियांशी मुस्लिम लीगच्या ऐन उमेदीच्या काळात विवाह करून नियतीने हिशोब पूर्ण केलाच.
बाकी बॅरिस्टर जिना आणि मिसेस रट्टनबाई जिना यांचे एकमेकांवर निस्सिम प्रेम होते याचे अनेक दाखले पुस्तकात सापडतात. वरवर पाषाण हृदयी, निष्ठूर आणि निर्दयी वाटणारे जिना सरोजिनी नायडूंनी त्यांच्या कायम स्वरुपी आरक्षित ताज हॉटेलातील खोलीतून लिहिलेली पत्रे, ते आतून किती हळवे होते याचा अंदाज देतात.
पुस्तकात जिनांचे फार काही कौतुक लिहिले नाहीये (तो उद्देशदेखील नाहीये), परंतु जिना अफाट कष्टाने वकिलीत आणि राजकारणात उंचीवर पोचले आणि इंग्रजांविरुद्ध त्वेषाने लढले हे निश्चितच जाणवते.

No comments:
Post a Comment