*दिवाळीत जरूर वाचावे असे पुस्तक* #तुरुंगरंग
समजा...देव ना करो पण समजा...समजा, जर तुम्हाला जेलमध्ये एखाद्या गुन्ह्यात कच्चा कैदी म्हणून जायची वेळ आली तर? येरवड्यात काय खाल, कुठे झोपाल, दिवसभर काय कराल, डेंजर अस्वच्छतेत संडासला होईल का, भाई लोक्स कसे असतात, जेल मॅन्युअल नक्की काय सांगते.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत.
माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी त्यांच्या तुरुंगवासातील १४ महिन्यांच्या अनुभवावर लिहलेले "तुरुंगरंग" हे विस्फोटक, निःशब्द करणारे बोली भाषेत लिहलेले पुस्तक नुकतेच वाचले. या पुस्तकात त्यांनी येरवडा जेलच्या लाल गेटच्या आतले कैद्यांचे भावविश्व उलगडून दाखवले आहे.
पुस्तकात लेखकाने कुठेही स्वतःच्या केसविषयी लिहले नाहीये, ना कुठली सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केलाय... लेखक हा पुस्तकाचा हिरो नाहीच्चे... तो आपला सर्वांचा खुफिया मॅन आहे, जो येरवडा जेलच्या सगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन तिकडच्या जगात काय चालू आहे याची कॅमेरामन "संजय" सारखी माहिती देतोय असा फिल येतो.
हे पुस्तक जेलमधील भ्रष्ट, गांजावादी, बेफिकीर प्रशासनावर फ्लड लाईट मारते.. लेखक जरी जेल अधिकारी महात्मा गांधी वॉर्डात बंद्याना विवस्त्र करून पोत्यात घालून बेदम मारहाण करतात हे सत्य लोकांसमोर आणत असला, तरी जेल प्रशासनाच्या काही स्तुत्य उपक्रमांबद्दलही भरभरून बोलतात. "माणूस गुन्हेगार का होतो" या अध्यायात लेखकाने कैद्यांच्या मानसिक अवस्थेचा अचूक वेध घेतला आहे. येरवडा जेलमध्ये कैद्यांच्या अफलातून कलागुणांबरोबरच, आहेत त्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये गरज भागवण्यासाठी लावलेले जुगाड हे तर पेटंट साठी योग्य आहे, असे माझे मत झाले आहे.
२३०० क्षमतेच्या येरवडा जेलमध्ये ७२०० कैदी कोंबून ठेवल्याने व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत हे जरी सत्य असले, तरी प्रशासन आणि आपला देश हा मुहम्मद तुघलकाचे वारस आपण आहोत याची आठवण हे पुस्तक निखालसपणे करून देते.
या दिवाळीत हे पुस्तक जरूर वाचावे आणि मला पोस्टवर धन्यवाद द्यावेत 
.


No comments:
Post a Comment