Sunday, November 16, 2025

#२८ नागासाकी - लेखक क्रेग कोली

#marathibookreview #12/2025
असं म्हणतात की " अमेरिकेशी वाकडं, त्याची चुलीवर लाकडं". 'नागासाकी' ही क्रेग कोली यांनी लिहलेली आणि डॉ जयश्री गोडसे यांनी मराठीत अनुवाद केलेली सत्यकथा वाचल्यावर युद्धात अमेरिका जिंकण्यासाठी कुठल्या(?)ही थराला जाऊ शकते याचा अंदाज येतो.
हिरोशिमावर ६ ऑगस्टला पहिला अणुबाँब टाकल्याच्या घटनेपासून या ३४५ पानांच्या पुस्तकाची सुरवात होते. पुढच्या तीन दिवसात, म्हणजेच ९ ऑगस्टला फॅटमॅन नामक अणुबाँब डोक्यावर फुटण्याआधीचे नागासाकीतल्या सामान्य जपानी नागरिकांचे आयुष्य लेखकाने छान रंगवले आहे. त्याचबरोबर जर्मनीच्या बिनशर्त शरणागतीनंतर जपानला गुढगे टेकायला लावण्यासाठी दोस्त राष्ट्रातील राजकीय डावपेच यावर देखील प्रकाश टाकला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकी अध्यक्ष ट्रुमन यांच्याविषयी या पुस्तकामुळे नक्कीच पूर्वग्रह होऊ शकतो. तात्या नेहमीच म्हणतात ना - डेमोक्रॅटिक नेते युद्धपिपासू आहेत, १९४५ देखील याला अपवाद नव्हता. स्टालिन आणि रशियावर करायची कुरघोडी, जपानी सैन्य आणि माध्यमे यांनी हिरोशिमा स्फोटाची भीषणता कमी दाखवण्याची केलेली घोडचूक आणि जपानी माणसाकडे असलेले राष्ट्रप्रेम, शिस्त, संकटकाळी एकमेकांना मदत करण्याची वृत्ती याचे यथार्थ दर्शन या पुस्तकात घडते.
लिटिल बॉय आणि फॅट मॅन हे दोन अणुबाँब जपानने झेलून, त्यातून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली हे जरी प्रेरणादायी असले, तरी निरपराध जपानी नागरिकांचा निरंकुश संहार, किरणोत्सारामुळे झालेला त्रास हे येथे मांडू देखील शकणार नाही इतके भयावह वर्णन पुस्तकात वाचायला मिळाले. अणुबाँबचा प्रहार जमिनीवर झाल्यावर काही सेकंदात जिवंत माणसे राख झाली, कपडे जळून काहींची कातडी निघून हातात आली तर डोक्यावरचे केस क्षणात जळून, सकाळी पांढरेफटक पडलेले नागासाकी नागरिक संध्याकाळ होताहोता निळे काळे पडले. एका क्षणात दोन शहरे बेचिराख केली या बॉम्ब्सने!! खरं तर हे बॉम्ब अंगावर घेऊन आणि त्याचे परिणाम जपानने जगाला दाखवून, थोर उपकारच केले आहे. किमान कोणी सरफिर्या हुकुमशहा असे कृत्य परत करणार नाही ही प्रार्थना करूया🙏

कदाचित युद्धात पाशवी आणि क्रूर पद्धतीने वागणारे जपानी या दोन अणुबॉम्बच्या तडाख्यानंतर आमूलाग्र बदलला असावा, असे मला वाटते. त्यामुळे फक्त ४०० अब्ज डॉलर अमेरिकेने मदत केल्याने जपान विकसित झाला हे म्हणणे योग्य नसावे. वाचनीय !!

No comments:

Post a Comment