#marathibookreview #47/2025
जॅक रिचर सारखा धिप्पाड, राकट शरीरयष्टीचा माणूस ज्याने नाकावरच जबरदस्त ठोसा खाल्लेला आहे, नेब्रासकाच्या उड्डाणपुलाखाली आयोवाहून व्हर्जिनियाला जाण्यासाठी लिफ्ट मागत होता... तब्बल ५७ वाहनांनी झिडकारल्यावर त्याला लिफ्ट मिळाली - दोन पुरुष आणि एक बारबाला स्त्री !!
अत्यंत उत्कंठावर्धक आणि मती गुंग करणारी ली चाईल्ड या लेखकाची "अ वाँटेड मॅन" ही ४२८ पानांची कादंबरी वाचली. अफाट हाणामारी आणि बेफाट मनोरंजन तर आहेच, पण जॅक रिचरचे सतत प्रश्न विचारण्याची आणि किमान शब्दात कमाल अपमान करण्याची कला अद्भुत आहे. वाचकांना लठ्ठ माणसाच्या हॉटेलातले प्रकरण धमाल हसवते. कॅन्सस, नेब्रास्का, आयोवा, एलिनॉय आणि मिझूरी या पाच रटाळ आणि महाभूभागातील राज्यात छुप्या एफबीआय एजंट कारेन डेलफान्सो आणि एजंट सोरेन्स या अतिशय हुशार अधिकारी जॅक रिचरच्या मदतीने गुन्ह्याची उकल करतातच आणि एक महाभयंकर घातपात उघडकीस आणतात असे कथानकाचे स्वरूप आहे.
किंग, अमेरिकेत अतिरेक्यांसाठी बँक चालवणाऱ्या वाडिया आणि पुस्तकात बराच वेळ पाताळयंत्री वाटणाऱ्या मॅक्वीन या विल्हन पात्रांनी कथानक कल्पक बनवले आहे.
४२६ व्या पानावर शेवट गोड झाला, पाणी उपसा केंद्राच्या मागे मुडदा कोणाचा पडला आहे हे देखील समजते....तरी जॅक रिचर व्हर्जिनियाला नक्की कशासाठी चालला आहे, याचे वाचकांना अप्रूप वाटत राहते... उत्तर कदाचित या साहसी कथांच्या पुढच्या अंकात कळेल आपल्याला!
सरिता आठवले यांनी पुस्तकाचा अतिशय उत्तम अनुवाद केला आहे.

No comments:
Post a Comment