"स्टार विटनेस" म्हणजे फौजदारी खटल्यातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार. ख्यातनाम लेखक बाबा कदम यांनी ६० पेक्षा जास्त कादंबऱ्या सत्य घटनांवर लिहल्या...त्यातलीच एक २२८ पानांची कादंबरी "स्टार विटनेस"!!
सागरी जमातीतील बोरबेटचे पाटील - भागोजी पाटील आपल्या बेपत्ता कन्येची तक्रार द्यायला खोपोली पोलिस स्टेशनमध्ये येतात आणि कहाणीला सुरवात होते. सब इन्स्पेक्टर दुंडप्पा संकपाळ या घटनेचा तपास करायला घेतात आणि ऑनर किलिंगच्या दुहेरी खून खटल्यापर्यंत हा प्रवास पोचतो.
कादंबरीतील सर्वच पात्रे वाचकांना त्यांच्या खऱ्या आणि सोपे वागण्याने खिळवून ठेवतात. आरोपी सुब्रा पाटील, नायक आणि स्टार विटनेस गोपाल पांडे, डॉक्टर राव, झेनिथ कंपनीतील सुरक्षा प्रमुख जामदार साहेब हे सर्वच पात्रे कथानक नाट्यमय करतात.
कादंबरीच्या शेवटच्या भागात कोर्टातील आरोपींची पेशी, साक्षीदारांची उलटतपासणी, आरोपींचे वकील ऍडव्होकेट जोगळेकर यांचे दर्जेदार युक्तिवाद आणि पब्लिक प्रोसिक्युटर (लेखक स्वतः सरकारी वकील पदावरून निवृत्त झालेले आहेत) यांचा लढा हे कादंबरीत जान आणतात. सरतेशेवटी वाचकांना आंतर जातीय विवाहामध्ये समाजाच्या नाहक लुडबुडीबद्दल आणि खोट्या परंपरा याबद्दल नक्कीच क्षोभ निर्माण होतो, इतके हे ताकदवान पुस्तक !

No comments:
Post a Comment