Friday, March 6, 2026

#६२ अल् तमीर - लेखक विश्राम गुप्ते

#marathibookreview #9/2026

"अल् तमीर" हे पुस्तक चुकूनच हातात आले, पण खूप मनोरंजन करून गेले...अल् तमीर हे सौदी अरेबियातील कट्टर इस्लामिक राजवटीतले एक छोटे शहर. इथे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन आणि फिलिपिनो हे अजनबी लोकं - ' फुलूस ' म्हणजेच बक्कळ पैसा मिळवायला येतात आणि स्वतःचा धर्म, संस्कृती, रितीरिवाज यांना कोंडून टाकतात.
तर थंबन नायर या अल हिंद मधून आलेल्या मॅनेजरला त्याचा सौदी कनिष्ठ सहायक फोडतो इथून ही कादंबरी सुरू होते. मग नंतर स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ शैला गुप्ता त्यांच्या मेहरम प्रोफेसर गुप्ता यांच्या बरोबर फुलस कमवायला या रूक्ष वाळवंटात येतात आणि एकामागोमाग एक धक्कादायक आणि सुखद घटनांची मालिकाच सुरू होते.

कथानकाचा नायक विक्रम गुप्ता योगायोगाने मुला मुलींना एकत्र शिकवण्यास बंदी असलेल्या शाळेचा शिक्षक होतो आणि मग मुख्याध्यापक !! शाळेत अनेक उपयुक्त उपक्रम राबवतो आणि या शहरात कौतुकास पात्र ठरतो. मात्र शाळेतल्या जनरल बॉडीवरील राजकारण आणि भारतीयांमधली एकमेकांमधली धुसफूस या खेळखंडोब्यात ही शाळाच कशी फसते... सौदी मधल्या शुद्ध मुसलमानांना अल हिंद आणि पाकिस्तानचे मुसलमान देखील कसे निकृष्ट दर्जाचे वाटतात, तिकडे राहणाऱ्या अजनबींना फुलूस साठी कसे मजबुरीने राहायला लागते याचा वाचकांना अंदाज येतो. देवाच्या तसबिरी, मुर्त्या आणि स्त्रीचे चित्र असलेली पुस्तके असे एअरपोर्टवर कचऱ्याच्या बादलीत फेकणाऱ्या सौदी कट्टर कस्टम अधिकाऱ्यांच्या अंकापासूनच या २८८ पानांच्या कादंबरीत गल्फ मधील विश्व उलगडायला लागते.
लेखक विश्राम गुप्ते यांची सुमारे २० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ही कादंबरी नक्कीच वाचनीय आहे यात शंकाच नाही!

No comments:

Post a Comment